राष्ट्रवादीने भाजपचे वाजवले ‘बारा’; सोलापुरात बड्या नेत्यांचा रात्री पक्षप्रवेश
सोलापूर: राज्यातील आगामी विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपमधील बड्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रात्री १२ वाजता झालेल्या या प्रवेश सोहळ्याची सध्या राज्यभरात चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
भाजपचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस बिजू अण्णा प्रधाने, माजी नगरसेवक, सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, सुनील भोसले, किशोर पाटील, सुरेश पाटील यांनी सोमवारी रात्री राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
सत्ता नसली की माणसाचे संतुलन बिघडते. राज्याच्या सत्तेविना भाजपची तशीच परिस्थिती झाली आहे, असा टोला लगावत प्रत्येक आमदाराशी संपर्क साधून सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र, १७० आमदारांच्या जोरावर सरकार मजबूत उभे आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवत आहे, असे जयंत पाटील म्हणाले. बिजू अण्णा ज्या भारतीय जनता पक्षात काम करत होते, तिथे कार्यकर्त्यांना गरजेपुरते वापरून बाजूला सारण्याची प्रथाच आहे. कार्यकर्त्यांकडून काम करून घेणे आणि गरज संपली की कार्यकर्त्याला सोडून देणे ही प्रथा राष्ट्रवादीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांनाच योग्य वागणूक मिळते, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपमधील अनेक लोकांना पक्ष सोडायचा आहे. आता अनेकजण राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. सोलापूरचा कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करेल. येत्या महापालिका निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळवून हे काम करायचे आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.