
टोक्यो : रवी दहियाने काल कुस्तीमध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाने जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीत मुसंडी मारली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटूंची जोरदार कामगिरी सुरूच आहे. अटीतटीच्या झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत बजरंगने इराणच्या मुर्तझा चेका याला चितपट केले.
संघर्षपूर्ण झालेल्या पहिल्या लढतीत बरोबरी झाल्यानंतर सरस गुणांच्या जोरावर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या बजरंगने इराणच्या मुर्तझा चेकाविरोधातही सावध सुरुवात केली. बचावात्मक पवित्रा घेतलेल्या बजरंगला पंचांनी वॉर्निंग दिली. मात्र निर्धारित ३० सेकंदात गुण घेता न आल्याने प्रतिस्पर्धी इराणीयन मल्लाला १ गुण मिळाला. या गुणाच्या आधारावर मध्यांतराला इराणच्या मुर्तझा चेका याने १-० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या उत्तरार्धातही बजरंग काहीसा सावधच खेळत होता. त्यामुळे पंचांनी त्याला पुन्हा वॉर्निंग दिली. मात्र यावेळी बजरंगने जोरदार आक्रमण करत दोन गुण घेतले. तसेच संधी मिळताच प्रतिस्पर्ध्याला चितपट करून निर्धारित वेळेआधीच सामना जिंकला. आता उपांत्य फेरीत बजरंग पुनियासमोर ऑलिम्पिक पदकविजेता आणि तीन वेळचा विश्वविजेता असलेल्या हाजी अलियेव्ह याचे आव्हान असेल.
तत्पूर्वी किर्गिस्तानच्या इ. अकमातालिव्हविरुद्ध झालेल्या सुरुवातीच्या लढतीत बजरंगला चांगलाच संघर्ष करावा लागला होता. निर्धारित वेळेत ही लढत ३-३ अशी बरोबरीत होती. मात्र लढतीत बजरंगने एका चालीत दोन गुणांची कमाई केल्याने त्याला विजेता घोषित करण्यात आले. दरम्यान, महिलांच्या कुस्तीमध्ये मात्र भारताच्या पदरी निराशा हाती लागली. महिलांच्या ५० किलो वजनी गटात भारताच्या सीमा बिसला हिला ट्युनिशियाच्या सारा हमादीकडून १-२ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.