
टोक्यो : पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाला पराभव पत्करावा लागला. २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील ( ५७ किलो वजनी गट) कांस्यपदक विजेत्या अझरबैजानच्या आलीयेव्ह हाजीने हा सामना सहज जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. बजरंगचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले असले तरी त्याला कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.
पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियासमोर अझरबैजानच्या आलीयेव्ह हाजी याचे आव्हान होते. दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला बचावात्मक खेळ करत एकमेकांची ताकद चाचपडून पाहिली. सावध खेळ केला म्हणून हाजीला ३० सेकंदाची पेनल्टी दिली. त्यात बजरंगनं १ गुण घेतला. पण पुढच्याच मिनिटाला अझरबैजानच्या कुस्तीपटूनं डाव टाकून दोन गुण घेतले. हाजीची पकड करण्याचा प्रयत्न पुन्हा फसला अन् बजरंगला पोटावर झोपवून हाजीनं आणखी दोन गुण खात्यात जमा केले. पहिल्या तीन मिनिटांत हाजीनं ४-१ अशी आघाडी घेतली.
तीस सेकंदाच्या ब्रेकनंतर पुन्हा डावाला सुरुवात झाली अन् बजरंगच्या बदललेल्या डावपेचानं चुरस वाढवली. बजरंनं अझरबैजानच्या खेळाडूचा पाय पकडला, परंतु त्याला मजबूत पकड ठेवता आली नाही. अझरबैजानच्या खेळाडूनं भारी डाव टाकून ८-१ अशी आघाडी घेतली. बजरंगनं कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना दोन गुण घेते, परंतु अखेरच्या एक मिनिटांत त्याला पाच गुणांची पिछाडी भरून काढायची होती. बजरंगनं चार गुण घेतले, परंतु त्यानं तीन गुण दिलेही. त्यामुळे बजरंगला १२-५ अशी हार मानावी लागली.
बजरंग पुनियानं २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच्या नावावर २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे रौप्यपदक आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बजरंगनं २०१९ व २०१३ चे कांस्य आणि २०१८चे रौप्यपदक आहे. आशियाई स्पर्धेतही त्यानं एक सुवर्ण ( २०१८) व एक रौप्य ( २०१४) पदक जिंकले आहे. २०१५ मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार, २०१९ मध्ये पद्मश्री व खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित केले आहे.
अझरबैजानच्या हाजीनं उपउपांत्यपूर्व व उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रतिस्पर्धीवर एकहाती विजय मिळवला होता. त्यामुळे बजरंगसाठी उपांत्य फेरीचा सामना सोपा नक्कीच नव्हता. हाजीनं २०१४, २०१५ व २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ६१ किलो वजनी गटाचे सुवर्णपदक नावावर केले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत हाजीच्या नावावर दोन रौप्य व दोन कांस्यपदक आहेत.