
दुबई : यंदाच्या टी-२० विश्वचषकात कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर मात्र शेपूट घातली. सेमीफायनलच्या सामन्यात ५ विकेट्सनी पराभूत होत पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेला आहे, तर ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचा सामना रविवारी न्यूझीलंडशी होणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना तसा कमालीचा चुरशीचा झाला. एखाद्या रोलर कोस्टर राइडप्रमाणे कधी पाकच्या, तर कधी ऑस्ट्रेलियाच्या दिशेने झुकणाऱ्या सामन्यात अखेर ऑस्ट्रेलियानेच सरशी केली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने १७६ धावांपर्यंत मजल मारली होती. जे टार्गेट ऑस्ट्रेलियाने ५ गडी आणि एक ओव्हर राखून पूर्ण केलं आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड हे विजयाचे शिल्पकार ठरले.
पहिल्या षटकात कर्णधार माघारी परतूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावांचा रन रेट सुरेख ठेवला. पाकिस्तानच्या धावांपेक्षा त्यांनी पहिल्या १० षटकांत १८ धावा अधिक केल्या, परंतु त्यांनी दोन अतिरिक्त विकेट गमावल्या. टप्प्याटप्प्यानं विकेट पडूनही ऑस्ट्रेलियानं त्यांच्या धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीनंतर मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी सहाव्या विकेटसाठी तुफानी खेळी केली. पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचाही ऑसींना फायदा झाला.
https://twitter.com/T20WorldCup/status/1458853821338177537
कर्णधार बाबर आजम, मोहम्मद रिझवान आणि फाखर जमान या त्रिकुटानं आज ऑस्ट्रेलियाची वाट लावली. बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. बाबरनं पहिल्या विकेटसाठी रिझवानसह ७१ धावा जोडल्या. ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, ट्वेंटी-२० तील त्याचे हे ११ वे तर या वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठरले. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या.
https://twitter.com/T20WorldCup/status/1458865074777432065
सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर पाकचे सलामीवीर बाबर आणि रिजवान यांनी चांगली सुरुवात केली. बाबर ३० धावा करुन बाद झाला. ज्यानंतर रिजवान आणि फखरनं डाव सांभाळला. पाकला सामन्यात मोहम्मद रिजवानच्या अर्धशतकाने चांगली सुरुवात करु दिली. पण खरी फिनिशींग फखरच्या अर्धशतकानेच दिली. विशेष म्हणजे फखरचं अर्धशतक हे तुफानी ठरलं कारण पहिल्या १८ चेंडूत त्याने केवळ १८ रन केले. पण अखेरच्या काही षटकात त्याने गिअर वाढवत तुफान खेळी केली. मिचेल स्टार्कच्या २ ओव्हरमध्ये ३ षटकार ठोकत ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. शेवटच्या १५ चेंडूत फखरने ३८ धावा केल्या. रिजवानने ५२ चेंडूत ६७ धावांची तर फखर जमानने ३२ चेंडूत ५५ धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, पुन्हा एकदा शाहिन आफ्रिदी प्रतिस्पर्धींसाठी कर्दनकाळ ठरला. त्यानं पहिल्याच षटकात ऑसी कर्णधार अॅरोन फिंच याला भोपळ्यावर माघारी पाठवलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी ऑसींचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. शादाब खाननं ७ व्या षटकात मार्शला (२८) माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथही (५) काही कमाल न करता शादाबच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण, वॉर्नर सुसाट होता आणि त्यानं मोहम्मद हाफिजला मारलेला षटकार तर त्याहुन भन्नाट होता. वॉर्नर ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार मारून ४९ धावांवर माघारी परतला.
https://twitter.com/T20WorldCup/status/1458947161933201408
शादाबनं टाकलेला चेंडू वॉर्नरच्या बॅटच्या बाजूनं जात यष्टिरक्षक मोहम्मद रिझवाच्या हाती विसावला अन् जोरदार अपील झाली. अम्पायरनं वॉर्नरला बाद दिलं अन् तोही काही विचार न करता निघाला. पण, रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागलाच नसल्याचे दिसले आणि चर्चेला विषय मिळाला. शादाबनं २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलही ७ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या सहा षटकांत ६८ धावा करायच्या होत्या. पाकिस्तानी खेळाडूंकडून दोन सोपे रन आऊट चुकले. हसन अलीनं १६व्या षटकात १२ धावा दिल्या आणि ऑसींना २४ चेंडूंत ५० धावा करायच्या होत्या. ३९ वर्षीय शोएब मलिकनं क्षेत्ररक्षणात चपळता दाखवताना पाकिस्तानसाठी रन वाचवले. पण, हॅरीस रौफनं टाकलेल्या त्या १७व्या षटकात १३ धावा आल्या.
मॅथ्यू वेडव व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाच्या आशा कायम राखताना सहाव्या विकेटसाठी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हसन अलीनं १८व्या षटकात १५ धावा दिल्या. १९व्या षटकात ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूंत २२ धावा करायच्या होत्या. शाहिननं १९वे षटक फेकले. पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसच्या बॅटला कड लागून तो रिझवानच्या हाती विसावला, परंतु त्याआधी टप्पा पडल्यानं स्टॉयनिसला जीवदान मिळालं. तिसऱ्या चेंडूवर हसन अलीनं मॅथ्यू वेडचा झेल सोडला अन् पाकिस्तानवर दडपण आलं. अनुभवी फलंदाज शोएब अलीला धीर द्यायला धावला. पुढच्या चेंडूवर वेडनं मारलेला स्कूप षटकार अप्रतिम होता. पाचव्या चेंडूवर वेडनं आणखी एक षटकार खेचून ७ चेंडू ६ धावा असा सामना जवळ आणला. वेडनं सलग तिसरा षटकार खेचून ऑस्ट्रेलियाला ५ विकेट व ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
वेड १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या,तर स्टॉयनिस ४० धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे.
https://twitter.com/T20WorldCup/status/1458855806795862019
सामना कुठे हरलो, कोणता होता टर्निंग पॉईंट; बाबर आझमचं स्पष्टीकरण
पहिल्या षटकात कर्णधार माघारी परतूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावांचा रन रेट सुरेख ठेवला. पाकिस्तानच्या धावांपेक्षा त्यांनी पहिल्या १० षटकांत १८ धावा अधिक केल्या, परंतु त्यांनी दोन अतिरिक्त विकेट गमावल्या. टप्प्याटप्प्यानं विकेट पडूनही ऑस्ट्रेलियानं त्यांच्या धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीनंतर मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी सहाव्या विकेटसाठी तुफानी खेळी केली. पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचाही ऑसींना फायदा झाला. दरम्यान, सामन्यानंतर बोलताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं आपल्या चुकांबद्दल स्पष्टच सांगितलं. ‘मॅथ्यू वेडचा कॅच सुटणं हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. जर त्याचा कॅच घेतला असता तर मैदानावर नवा बॅट्समन आला असता. अशावेळी वेगळी परिस्थिती असती, कदाचित सामन्याचा निकालही वेगळा असता,’ असं बाबर आझम म्हणाला.
‘ज्या प्रकारे आम्ही खेळ सुरू केला तो आम्ही ठरवल्याप्रमाणेत च होता. आम्ही चांगला स्कोअरही केला. आमची गोलंदाजी आज तितकी चांगली झाली नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही कॅच सोडाल तर निकाल असाच बदलेल आणि तोच टर्निंग पॉईंटही होता,’ असंही त्यानं स्पष्ट केलं.
‘आम्ही ज्या पद्धतीनं संपूर्ण स्पर्धेत खेळलो तो खेळ वाखाणण्याजोगा होता. आम्ही येणाऱ्या दिवसांत आणखी चांगलं करण्याचे प्रयत्न करून. प्रत्येक खेळाडूला जो रोल देण्यात आला होता, तो त्यानं योग्यरित्या पार पाडला. ज्या प्रकारे लोकांनी आम्हाला सपोर्ट केलं तेदेखील उत्तम होतं. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो,’ असंही आझमनं सांगितलं.
सामना ऑस्ट्रेलियाच्या हातून निसटेल असे वाटले होते : फिंच
‘आज मला वाटलं होतं की हा सामना आमच्या हातून निसटून जाईल. ज्या चेंडूवर शाहीननं मला आऊट केलं तो एक चांगला चेंडू होता. आम्ही फिल्डींगच्या वेळी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. परंतु वेड आणि स्टोयनिस यांनी ज्याप्रकारे खेळ केला तो जबरदस्त होता, असं फिंचनं नमूद केलं.
मोहम्मद रिझवानकडून धावांचा पाऊस
पाकिस्तानचे सलामीचे फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. बाबर आझम पाठोपाठ आता मोहम्मद रिझवानच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये मोहम्मद रिझवानने आतापर्यंत ३ अर्धशतकं झळकावली आहेत. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ५२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. तर एका वर्षात टी २० स्पर्धेत १००० धावा करण्याचा विक्रम केला आहे. मोहम्मद रिझवाननंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा नंबर लागतो. त्याने एका वर्षात ८२६ धावा केल्या आहेत.
मोहम्मद रिझवानने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५५ चेंडूत ७९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्ध ३४ चेंडूत ३३ धावा, अफगाणिस्तान विरुद्ध ८ धावा, नामिबिया विरुद्ध ५० चेंडूत ७९ धावा, स्कॉटलँड विरुद्ध १५ धावा केल्या होत्या. मोहम्मद रिझवानने ६ सामन्यात एकूण २८१ धावा केल्या असून दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ३०३ धावांसह बाबर आझम आहे.
पाकिस्तानच्या बाबर आझमची ‘विराट’ कामगिरी; कोहलीला धोबीपछाड
टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहे. सुपर १२ फेरीतील सलग ५ सामने जिंकत पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चांगलाच फॉर्मात आहे. बाबर एक एक करत अनेक विक्रम आपल्या नावावर करत आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात बाबरने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबर आझमने ३४ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. या खेळीत ५ चौकारांचा समावेश आहे. टी २० मध्ये वेगाने २५०० धावा करण्याचा विक्रम करत विराट कोहलीला मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३२ धावा करताच त्याने हा विक्रम नोंदवला आहे. बाबर आझमने ६२ सामन्यात वेगाने २५०० धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने ६८ सामन्यात २५०० धावा केल्या होत्या.
दुसरीकडे, पदार्पणाच्या टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबरने टी २० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत ३०३ धावा केल्या आहेत. बाबरच्या आधी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनच्या नावावर होता. हेडनने २००७ मध्ये २६५ धावा केल्या होत्या. हेडन सध्या पाकिस्तानी संघाचा फलंदाजी सल्लागार आहेत.
फायनल पाहायला येणार होते पंतप्रधान इम्रान खान…
साखळी सामन्यात भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया या संघांना लोळवून उपांत्य फेरीत पोहोचणारा पाकिस्तान संघ जेतेपद पटकावेल, असाच दावा केला गेला. त्यांचा फॉर्म पाहता त्यात काही चुकीचंही नव्हतं. त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान व माजी कर्णधार इम्रान खान हेही फायनलमध्ये पाकिस्तानला चिअर करण्यासाठी येणार होते. पण, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव केला अन् इम्रान खान यांचं विमान दुबईच्या दिशेनं उड्डाण करण्याआधीच मागे फिरलं. पाकिस्ताननं आजचा सामना जिंकला असता तर १४ नोव्हेंबरला खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी इम्रान खान दुबईत येणार होते. पण आता त्यांना मायदेशातच थांबावे लागेल. पाकिस्तानच्या पराभवानंतर त्यांनी ट्विट केलं की, बाबर आजम आणि टीमसाठी- मला माहित्येय यावेळी तुमच्या मनात काय चाललं असेल , कारण मिही या परिस्थितीतून गेलोय. पण, तुम्ही ज्या प्रकारे खेळलात त्याचा अभिमान आहे. ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन.
२०१० मध्ये माईक हसी अन् २०२१ मध्ये मॅथ्यू वेड; ऑस्ट्रेलियाचे ‘डावे’ पाकिस्तानला नडले
विश्वचषकाच्या कोणत्याही नॉक आऊट स्पर्धेत आजवर पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाचा पराभव करता आला नाही. एकदिवसीय किंवा टी २० विश्वचषक पाकिस्तानला कायमच ऑस्ट्रेलियासमोर पराभव पत्करावा लागला आहे. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तेच झालं. मॅथ्यू वेडनं सामन्यात जबरदस्त फटकेबाजी करत पाकिस्तानला धूळ चारली.
२०२१ मध्ये डावखुऱ्या मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीनं पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. तर यापूर्वी २०१० मध्ये विश्वचषक सामन्यामध्ये मायकेल हसीनं २४ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी करत पाकिस्तानला धुळ चारली होती. तर यावेळी मॅथ्यू वेडनं १७ चेंडूंमध्ये ४१ धावा करत पाकिस्तानला थेट घरचाच रस्ता दाखवला. मॅथ्यू वेडच्या खेळीनं २०१० मधल्या मायकेल हसीच्या खेळीची आठवण आणून दिली.
यापेक्षा एक विशेष बाब म्हणजे दोन्ही खेळाडूंनी षटकार ठोकतच सामना जिंकवला होता. मायकेल हसीनं २०१० मध्ये झालेल्या टी २० विश्वचषक सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये ३ षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता मॅथ्यू वेडच्या रूपानं झाली. मॅथ्यू वेडनं पाकिस्तानविरोधातील सामन्यात १९ व्या ओव्हरमध्ये ३ षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.