पश्चिम बंगालमध्ये माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक डिंडावर हल्ला; गाडी फोडली
निवडणूक रॅलीदरम्यानचे कृत्य; दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी संपला. निवडणूक प्रचार काळात हिंसाचाराच्या मोठ्या घटना सातत्याने घडत आहेत. यात राजकीय नेते आणि उमेदवारांवरील हल्ल्यांचाही समावेश आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवलेले अशोक दिंडा यांच्यावर हल्ला झाला आहे. अशोक दिंडा यांचा रोड शो सुरु होता. त्यावेळी हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे.
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मोयनामधील BDO जवळ मला घेरलं आणि हल्ला केला. हा हल्ला दुपारी 4 वाजता झाला, असं ट्विट दिंडा यांनी केलं आहे. दिंडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोयना विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मंगळवारी या परिसरात प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 27 मार्च रोजी पार पडला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराची सांगता झाली आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही प्रचारात जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 एप्रिलला होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी निकाल लागेल.