एटीएसची मोठी कारवाई; मनसुख हिरेन आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक
मुंबई : एटीएसने मोठी कारवाई केली असून मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुकीसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचा या हत्येत हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. हिरेन हत्येप्रकरणात पहिल्यांदाच अटक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी माहिती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसुख हिरेनप्रकरण कालच एनआयएकडे देण्यात आलं आहे. त्यानंतर आज एटीएसने या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांचा हिरेन मृत्यूप्रकरणात हात असल्याचं बोललं जात आहे. आता या दोघांचा ताबा एनआयएकडे देण्यात येणार आहे. एटीएसने नरेश धारे आणि विनायक शिंदे या दोघांना अटक केली आहे. धारे हा बुकी असून शिंदे हे पोलीस दलात होते. मात्र त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं. या दोन जणांना अटक केल्यानंतर हिरेन प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिरेनप्रकरणी एटीएसने आतापर्यंत 25 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातून बरेच धागेदोरे एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.