
महामारी आणि महागाईने सामान्य जणांचे जगणे कठीण झालेले असताना त्यांना या प्रश्नांवर दिलासा देण्याऐवजी जणू जनतेने आपल्याला त्यासाठीच आशीर्वाद दिले आहेत हे गृहीत धरून केंद्र सरकारने नव्या मंत्र्यांना देशभरात कामाला लावले आहे. जनता जिथे दांडक्याने नेत्यांना हाणायला आतुर झाली असताना मंत्री जन आशीर्वाद यात्रेचे सोंग घेऊन लोकांपुढे जाण्याचे नाटक करीत असतील तर जनतेचे जबरदस्तीने आशीर्वाद घेण्याचे हे मोठे जबर मोदी तंत्र म्हटले पाहिजे. अडचणीच्या काळात सुरू झालेल्या या यात्रेमध्ये जन आणि आशीर्वाद या दोन्हींचा अभाव असला तरी तो असल्याचा आभास निर्माण केला जात आहे.
दोन वर्षात कोरोना साथीने सगळे ठप्प करून टाकल्यामुळे व्यवसाय, धंदे, रोजगार बुडाले, वरून पेट्रोल दरवाढीच्या केंद्र सरकारच्या भेटीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या किंमती दर महिन्याला वाढत आहेत. लोकांच्या हातात असणारे रोजगार हिसकवले गेल्याने नैराश्य येऊन तरुणांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अशा संकटाच्या काळात त्यांच्या मदतीला धावून जाण्याचे सोडून ज्यांना अशा यात्रा काढाव्याशा वाटतात ते लोक आणि त्यांची विचारधारा खरोखरच धन्य म्हटली पाहिजे. लोकांना जे हवे ते देण्याचा विचार करणार्या आज वरील सगळ्या सत्ताधार्यांना मूर्खात काढीत जे आपल्याला अपेक्षित आहे ते लोकांवर थोपविण्याचा हा नवा पायंडा भाजप सरकारने पाडला आहे.
राज्यात नारायण राणे आणि कपिल पाटील हे मंत्री जनतेसाठी तत्काळ उपाय म्हणून जन आशीर्वाद यात्रा घेऊन फिरत आहेत. राणे ज्या कोकणातून येतात त्या कोकणातील लोकांच्या घरात पुराने झालेला चिखल अजून सुकला नाही, जनजीवन सुरळीत झाले नाही. मोडून पडलेला संसार अजूनही उभारला गेला नाही असे असताना राणे आपल्या तोंडाळ पुत्रांना घेऊन जर त्रस्त लोकांच्या जखमेवर यात्रांचे मीठ चोळत असतील तर हे अधिकच भयंकर आहे. सामान्य लोक उन्मत्त सत्ताधीशांना बोलत नसतात. समोर जे घडेल त्याचे मूकदर्शक बनत असतात, मात्र संधी मिळताच असा काही रट्टा मारतात की त्याचे दुखणे दीर्घकाळ जात नाही. भाजपवाले हा अनुभव एवढ्या लवकर विसरतील असे वाटले नव्हते.
केंद्रात मुळात राणे यांची वर्णीच सेना, उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार यांच्याशी दोन हात करण्यासाठी लावण्यात आल्याचे आता लपून राहिले नाही. राणे त्याचा पूर्ण लाभ उठवत जुन्या शत्रुत्वाला उजाळा देऊन राज्यातील सामंजस्य लयाला नेण्याचे उत्तम काम करू शकतात याची भाजपला खात्री आहे. जन आशीर्वाद यात्रेतून सामान्य जनतेचा कोणताही लाभ होणार नाही. झालाच तर भाजपमध्ये नारायण राणे यांचा गट अधिक प्रबळ होईल. त्यावर राणेंचे पाच-पन्नास कोटी रुपये उडवले जातील, यापलीकडे वेगळे काही घडणार नाही याची खुद्द भाजपलाही नक्कीच जाणीव असेल.
राज्यात कोरोनाचे संकट अजून संपले नाही. तिसर्या लाटेचा धोका कायम आहे. अशावेळी लोकांच्या जीवित्वाचा विचार न करता गर्दीचे उत्सव आयोजित करणे अलीकडे भाजपच्या तत्त्वात कसे बसायला लागले हे कळत नाही. पार्टी विथ डिफरन्सला भाजपने फारकत देऊन सवंग कार्यक्रम साजरे करायला घेणे राज्याच्या प्रकृतीला मानवणारे नाहीत. लोक एका मर्यादेपर्यंत असली नाटके सहन करतात आणि मर्यादा ओलांडली की लोकांच्या सहनशीलतेचा कडेलोट होतो हे विसरता येणार नाही.




