लाचखोरी प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील निलंबित

मुंबई : लाचखोरीच्या प्रकरणात जोगेश्वरी मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच निलंबन करण्यात आलं आहे. सुजाता पाटील यांना काही दिवसांपूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर लाचखोरीचा गुन्हा दाखल करत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती. सध्या सुजाता पाटील जामिनावर बाहेर आहेत. मात्र या प्रकरणाची गृहविभागाने गंभीर दखल घेत आदेश काढून सुजाता पाटील यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.
सुजाता पाटील मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळत होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी सुजाता पाटील यांनी एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एका व्यक्तीने दाखल केली होती. यातील लाचेच्या पहिल्या टप्प्यातील ४० हजारांची रक्कम घेत असताना सुजाता पाटील यांना एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले होते.
जोगेश्वरीतील तक्रारदार गाळेधारकराने त्याचा गाळा एका महिलेला भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी दिला होता. ५ ऑक्टोबरला तो गाळा त्याने संबंधीत महिला भाडेकरूकडून ताब्यात घेतला. मात्र भाडेकरु महिलेने इतरांच्या मदतीने गाळ्याचे कुलूप तोडून गाळ्यात प्रवेश केला. याबाबत गाळेधारकाने जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये भाडेकरु महिलेविरोधात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांकडून तक्रार दाखल करुन घेण्यास विरोध करण्यात आला. यावेळी तक्रारदार गाळेधारकाने एसीपी सुजाता पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. यावेळी एसीपी सुजाता पाटील यांनी तक्रारदारांकडून गाळ्यावर हक्क गाजवणाऱ्या महिला भाडेकरूकडून भविष्यात त्रास होऊ नये यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. यातील १० हजार रुपयांची रक्कम सुजाता पाटील यांनी त्याच दिवशी घेतली. मात्र उर्वरित रकमेसाठी सुजाता पाटील तक्रारदार गाळेधारकाकडे तगादा लावत होत्या. मात्र सुजाता पाटील यांच्या त्रासाला कंटाळलेल्या तक्रारदार गाळेधारकाने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यानंतर एनसीबीने सापळा रचत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती.
सुजाता पाटील यापूर्वी देखील अनके कारणांसाठी चर्चेत आल्या होत्या. सुजाता पाटील यांनी हिंगोलीला बदली न झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहिले होते. यात पत्रात त्यांनी बदली न करुन दिल्यास आत्महत्या आणि राजीनामा असे दोन पर्याय शिल्लक असल्याचे म्हणत खंत व्यक्त केली होती. मात्र सुजाता पाटील यांच्या पत्राने पोलीस दलात मोठी खळबळ उडवून दिली.