पाच राज्यांतील निवडणूक निकालांचे काऊंटडाऊन सुरू
पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी
नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या पाचही राज्यांचा निवडणुकांचा उद्या रविवारी निकाल लागणार आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उद्या कोण विजयी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत. आसाममध्ये एकूण १२६ जागा आहेत. केरळमध्ये १४०, तामिळनाडूत २३४ आणि पुद्दुचेरीत ३० जागा आहेत. या सर्व जागांसाठी उद्या रविवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आसामसह केरळवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. तर भाजप आणि तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालवर सर्वाधिक फोकस केला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागलं असून बंगालमध्ये काय होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रविवारी सकाळी ८ वाजता या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत या पाचही राज्यात कुणाची सत्ता येणार याचा अंदाज येणार आहे. पुद्दुचेरीचा संपूर्ण निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे. इतर चार राज्यांचे संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी रात्री उशिर होऊ शकतो, असं सांगितलं जातं. कोरोना संकटाचे नियम पाळून मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास उशिर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात आवताडे की भालके? पंढरपूरच्या विजयाचा गुलाल कुणाचा?
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल उद्या रविवारी लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. भालके यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली होती. या पोटनिवडणुकीसाठी एकूण ३४०८८९ मतदारांपैकी २२५४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ६६.१५ टक्के मतदान या पोटनिवडणुकीसाठी झालं. पंढरपुरात प्रचंड मतदान झाल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.