राजकारण

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल

जयपूरः राजस्थान सरकारच्या सर्व मंत्र्यांनी शनिवारी राजीनामे दिल्यानंतर आज राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येत आहे. आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. ११ आमदारांना कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथविधी पूर्वी सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता सर्व काही ठीक आहे आणि संपूर्ण पक्ष एक आहे. मात्र याच दरम्यान काही आमदारांच्या नाराजीची बाबही समोर आली आहे.

सचिन पायलट यांनी मंत्र्यांच्या नव्या यादीचे कौतुक केले असले तरी या यादीवर सगळेच खूश नाहीत. आमदार जोहरीलाल मीणा यांनी रविवारी सांगितले की, विधानसभेतील सर्वात भ्रष्ट सदस्याला अलवर जिल्ह्यातील मंत्री करण्यात आले आहे. ते काँग्रेस नेते टिकाराम जूली यांच्याबद्दल बोलत होते, ज्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. अलवर जिल्ह्यासाठी आजचा काळा दिवस आहे, गरज पडल्यास मी राजीनामा देईन, असे जोहरीलाल मीना यांनी सांगितले.

काँग्रेसचे आमदार बाबूलाल बैरवा यांनीही नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेवर नाराजी व्यक्त केली. जोहरीलाल मीना, शाफिया झुबेर आणि बसपा आमदार दीपचंद खाडिया यांनीही अलवर जिल्ह्यातील टिकाराम जुली यांना कॅबिनेट मंत्री बनवल्याबद्दल नाराजी व्यक्त केले.

दरम्यान, राजस्थानमध्ये नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंत्री झालेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट केले, आज राजस्थान सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन. गेल्या 35 महिन्यांत आपल्या सरकारने राज्याला संवेदनशील, पारदर्शक आणि उत्तरदायी सुशासन देण्याचे काम केले आहे. सर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या सरकारने राज्याला विकासाच्या वाटेवर नेले आहे.

दरम्यान, विरोधकांंनी राजस्थानमधल्या नवीन मंत्रिमंडळावर टोलेबाजी केली. भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे १५ पैकी फक्त ३ मंत्री महिला आहेत, म्हणजे २० टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये जिथे चौथ्या क्रमांकावर आहे, तिथे ४० टक्के तिकीट देण्याचे खोटे आश्वासन देत आहे. प्रियांका गांधींच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये ४० टक्के तिकिटे महिलांना देण्याची घोषणेबद्दल ते बोलत होते.

सचिन पायलट आज सकाळी म्हणाले होते की, त्यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची विचारसरणी पुढे आणली असून या विचारसरणीनुसार तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एससी आणि एसटी मंत्रीही करण्यात आले आहेत. काँग्रेसने राजस्थानात पंजाबचा फॉर्म्युला वापरल्याचं सांगितलं जात आहे. कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच चार अनुसूचित जातीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. ममता भूपेश, भजनलाल जाटव, टीकाराम जुली आणि गोविंद मेघवाल या चार दलित नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय कोणत्याही अपक्ष आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button