राजकारण

शिवसेना गोव्यात २२ जागांवर लढणार : संजय राऊत

मुंबई: पुढील वर्षी होणाऱ्या विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. यात सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांकडे असणार आहे. तर, विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांत गोव्याचाही समावेश असून, गेल्या दोन ते तीन दिवसांतील घडामोडीनंतर राजकीय मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. तसेच गोव्यातील राजकारण तापतानाही पाहायला मिळत आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोव्यात दाखल होत आहेत. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे. उद्धवजींच्या आदेशानुसार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना गोव्यात २२ जागांवर लढणार आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत गोवा दौऱ्यावर निघाले आहेत. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने तिकडे चाललो आहे. बाळासाहेब ठाकरेही तिकडे प्रचारासाठी गेले होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा, जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजप तिकडे सत्तेवर आली. मात्र, त्या सगळ्याला आता भाजपचा पाठिंबा आहे. कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजप फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. भाजप कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करू शकते. आमचे गोव्यात प्राबल्य आहे. कोणासोबत युती किंवा आघाडी झाली तर ठीक, नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, असे संजय राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button