दिलगिरी व्यक्त केली ठीक आहे, पण चुकीला माफी नाही; राऊतांचा भाजपला सूचक इशारा

नवी दिल्ली : वेळ आली तर शिवसेना फोडू असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा विषय शिवसेनेकडून संपला नसल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली ठिक आहे, पण चुकीला माफी नाही असा सूचक इशारा दिला आहे.
शाब्दिक चकमकी राजकारणात होत असतात. बाळासाहेब ठाकरे सुद्धा दोन देत होते, त्याबदल्यात त्यांच्यावर टीका देखील झाली आहे. टीकेला शिवसेनेने कधी पाठ दाखवली नाही. आम्ही टीका सहन करणारे लोकं आहोत. टीका होत असते आणि आमच्या पद्धतीने टीकेला उत्तर देत असतो. भाषेविषयी मदभेद असू शकतात. टीकेचे प्रहार देत घेत पुढं जाणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण ज्या प्रकारची भाषा शिवसेना भवनासंदर्भात वापरली गेली, महाराष्ट्राच्या कोणत्याही पक्षाच्या विचारांच्या मराठी लोकांना हे आवडलेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.
कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. आम्हाला काय करायचं माहिती आहे. शिवसेनेला माहिती आहे. या आसपास फिरुन दाखवा असं आव्हान देत दिलगिरी व्यक्त केली ठिक आहे पण या चुकीला माफी नसते, असा सूचक इशारा राऊतांनी दिला. महाराष्ट्र आणि शिवसेना हे लक्षात ठेवेल असं संजय राऊत म्हणाले.