Top Newsराजकारण

कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही; अनिल परब यांचे प्रत्युत्तर

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आज आमदार नितेश राणे यांनीही आंदोलकांची भेट घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. याबाबत अनिल परब यांना विचारलं असता, कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही, असं प्रत्युत्तर परब यांनी दिलं आहे.

नितेश राणे यांचे आरोप आम्ही मोजतच नाही. कोण नितेश राणे? त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही, असं अनिल परब म्हणाले. तसंच कालपर्यंत २ हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केलाय.

अनेक कर्मचारी कामावर येत आहेत. काल सांगितलं होतं की कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल आणि जे अडवणूक करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या कमिटीसमोर जावं आणि म्हणणं मांडावं. १२ आठवड्याच्या कालावधीत समितीचा जो अहवाल येईल तो आम्हाला आणि कर्मचाऱ्यांनाही मान्य असेल. आपण कामावर जा, कामावर गेलात तर आपलं नुकसान होणार नाही. राजकीय पक्ष राजकीय पोळ्या भाजतील, पण नुकसान आपल्याला सहन करावं लागेल, असं आवाहनही परब यांनी केलं.

एसटीच्या विलिनीकरणाचा विषय उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे संपकऱ्यांना भडकावण्याचं काम करत आहेत. कर्मचाऱ्यांची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीत. कामगारांनी सदसद्विवेकबुद्धीने विचार करावा. कोरोना काळात एसटीचं मोठं नुकसान झालं आहे. आता संपकऱ्यांनी एसटी पुन्हा खड्ड्यात जाईल असं काही करु नये, असंही परब म्हणाले.

माझ्यावर आरोप करा, पण कामगारांचे नुकसान करु नका

शरद पवार यांच्या एका व्हिडीओबाबत पत्रकारांनी विचारलं असता, पवारांचा व्हिडीओ मी पाहिलेला नाही. विलिनीकरण्याची मागणी दोन-तीन वा चार दिवसांत मान्य होऊ शकत नाही. समितीचा अहवाल आल्याशिवाय त्यावर निर्णय होऊ शकत नाही. पगाराबाबत काही मागण्या आहेत त्यावर चर्चा होऊ शकते. हायकोर्टाच्या निर्णयानुसार कमिटीच विषय हाताळेल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं परब यांनी स्पष्ट केलंय. तसंच माझ्यावर काय आरोप करायचे ते करा, पण कामगारांचं नुकसान करु नका. आज जे काही सुरु आहे त्यातून कामगारांचं नुकसान होत आहे. त्यांनाही माहिती आहे की आपण चुकीची मागणी लावून धरली आहे, असंही परब म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा : आ. नितेश राणे

आमदार नितेश राणे यांनीही संपाला पाठिंबा दिला. त्यावेळी, मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर त्यांनी निशाणा साधला. भाजप सरकारमध्ये दिवाकर रावते हे कोणाच्या मांडीला मांडी लावू बसले होते. मुख्यमंत्री भाजपचे असतानाही परिवहन महामंडळ शिवसेनेकडेच होतं, त्यावेळी का आग्रही मागणी केली नाही. शिवसेनेची एसटीमध्ये कामगार संघटना आहे, त्यांनीही का बोलले नाही. उगाच, भाजपकडे बोट दाखविण्यात काय अर्थ आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. तसेच, विलिनीकरणाला वेळ लागणार आहे, मग एक दिवसांच विशेष अधिवेशन बोलवा. उद्या किंवा परवा एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही सगळेच्या सगळे आमदार येतो, एकमुखी पाठिंबा देतो, एक आमदार विरोध करणार नाही, असे नितेश राणेंनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी मुंबईतच हे अधिवेशन बोलवा, नागपूरलाही नको, असेही राणे म्हणाले.

नबाब मलिक गद्दार, दहशतवाद्यांना साथ देणारा देशद्रोही : नितेश राणे

यावेळी नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावरही जोरदार प्रहार केला. नबाब मलिक हा गद्दार आहे. अतिरेक्यांना साथ देणारा देशद्रोही आहे, त्याच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देता कामा नये, त्याला पाकिस्तानला हाकलून द्या, असे म्हणत नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर जहरी टीका केली. नबाव मलिक मंत्रिमंडळात आहेतच कसे? त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणीही राणे यांनी केली.

मुख्यमंत्र्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली. मुख्यमंत्र्यांच्या मानेवर कसलीशी सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी निष्कर्ष काढलाय या माणसाला कणा तरी आहे का? मुख्यमंत्र्यांच्या मानेला उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला असल्याचे राणे यांनी म्हटले. नुसतं ठाकरे लावलं म्हणजे बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेब कुठे तू कुठे, ठाकरे म्हणजे ठाकरेंचं रक्त येत नाही. रक्ताची चाचणी करण्याची वेळ आणू नको असे नितेश राणे यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button