अनिल परब, मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्याचीही चौकशी सुरू : चंद्रकांत पाटील
नाशिक : कुणाला अटक झाली तर प्रतिक्रिया द्यायला मी नाशिकमध्येच आहे, असं विधान करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिली होती. आता चंद्रकांतदादांनी आणखी मोठं विधान केलं आहे. शिवसेना नेते अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची चौकशी सुरू आहे, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. रात्रीतून कुणाला अटक झाली तर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मी नाशिकमध्ये उपलब्ध आहे, असं म्हटलं होतं. मी कुणाचेही नाव घेतलं नव्हतं. खूप जणांच्या चौकश्या सुरू आहेत. त्यातील अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे. माझा नेमका रोख कुणाकडे नव्हता. तुम्हाला सोप जावं म्हणून नावांची यादी देत आहे. कुणालाही उघडं पाडायचं नाही. कुणाकडे रोख नाही. केवळ माहिती देत आहे. अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी काल कोणी तरी कोर्टात गेलंय. नितीन राऊत यांनाही कोर्टाने फटाकरलं आहे. संजय राठोड यांचाही एक मॅटर पेंडिग आहे. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचीही चौकशी सुरू आहे. केवळ तुम्हाला सोपं पडावं म्हणून आताच नावं घेतली आहेत, असं पाटील म्हणाले.
जरंडेश्वरच्या निमित्ताने सर्वच कारखान्यांची चौकशी करा म्हणालो. समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आधीच चौकशीची मागणी केली आहे, असं ते म्हणाले. अनिल देशमुख यांची मालमत्ता सील करण्यात आली, ही ईडीची कारवाई आहे. ईडीचा अर्थच आर्थिक अनियमितात मॉनिटरींग करणं असा होतो, असं त्यांनी सांगितलं.
राज यांच्यासोबत चहा घ्यायला हरकत नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरेही नाशिकमध्ये आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. मी कधीही त्यांच्या घरी जाऊ शकतो. त्यांच्या आणि माझ्या वेळा जुळल्या तर त्यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला हरकत नाही, असं सांगतानाच नाशिकमध्ये मनसे-भाजप युती होईल की नाही हे सांगणं माझा अधिकार नाही. असं काही ठरलं नाही. तसेच परस्पर निर्णय घेण्यासाठी मी प्रसिद्धही नाही, असं त्यांनी सांगितलं.
आघाडीचा गेम सुरू
यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याची खिल्ली उडवली. मी मारतो तू लागल्यासारखं कर असं यांचं सुरू आहे. जनता निवडणुकीची वाट बघत आहे. २०२२ मध्ये निवडणुका आहेत. हा सर्व गेम सुरू आहे. तीन पक्षात रोज सकाळी गेम सुरू होतात आणि दिवसभर कोणी काय गेम खेळायचा हे त्यात ठरते, असा टोलाही त्यांनी लगावला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. त्यांनी दिल्लीत सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सहकारावर चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहे. पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावलं. ही रुटीन भेट होती. सहकार विषयाबाबत त्यांच्यात चर्चा झाली नाही असं वाटतं, असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांना विरोध नको, वारकऱ्यांना आवाहन
मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाणे हा मान असतो. त्यामुळे वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विरोध करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. तुम्ही निदर्शने करा. पण मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला जाण्यास विरोध करू नका, असंही ते म्हणाले.