राजकारण

अनिल देशमुखांचे भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या हाती; सोमवारी निर्णयाची शक्यता

फडणवीस आणि परमबीर सिंग दिल्लीत येऊन गेल्यावर 'लेटर बॉम्ब' : शरद पवार

नवी दिल्ली : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी भाजपकडून होत आहे. मात्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतचा चेंडू शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टोलावला आहे. शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली आहे.

दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग दिल्लीत येऊन गेले. त्यानंतर लेटरबॉम्बचे सर्व प्रकरण घडले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. या सगळ्याचा परमबीर सिंह यांच्या दिल्लीवारीशी काही संबंध आहे का, हे मला माहिती नाही. माझ्याकडे तसे पुरावे नाहीत. केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणे हा परमबीर सिंग यांचा अधिकार आहे. त्याबाबत माझा काहीही आक्षेप नाही. मात्र, सर्व घडामोडी फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्या दिल्लीवारीनंतरच घडायला लागल्या, ही गोष्ट शरद पवार यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. पण त्याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्रीच याबाबतचा निर्णय घेतील असं शरद पवार यांनी आज जाहीर केलं. गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत. परमबीर सिंग यांनी 100 कोटीच्या वसुलीचा आरोप केलाय. पण त्याबाबत पैसा कसा गोळा केला जातो याची माहिती त्यांनी दिलेली नाही. दरम्यान, देशमुखांची बाजूही आम्ही जाणून घेऊ. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पवार यांनी दिलीय.

सरकारवर कुठलाही परिणाम नाही
थेट गृहमंत्र्यांवर आरोप होत असल्यामुळे सरकारवर त्याचा काही परिणाम होईल का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावेळी महाराष्ट्र सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेवरही त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना आरोप का केला नाही? असा प्रश्नही पवारांनी विचारला आहे. विरोधकांकडून सरकार अस्थित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असंही पवार यांनी म्हटलंय.

देशमुखांबाबत निर्णय दोन दिवसांत
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल. देशमुख उद्या मुंबईत येतील. त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. तसंच अन्य नेत्यांशी बोलून देशमुखांबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे.

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना पोलिस सेवेत परमबीर सिंग यांनीच आणले, त्यामध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा कोणताही सहभाग नव्हता, असे सांगत त्यांनी या प्रकरणात सरकारलाही क्लिन चिट दिली. राज्य सरकारला या संपुर्ण प्रकरणात कोणताही धोका नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात परमबीर सिंग यांची चौकशी करण्याचा पर्याय पवारांनी सुचवला आहे. गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाच्या विषयावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राहिलेल्या जुलिओ रिबेरो यांच्या अध्यक्षतेत चौकशी करण्याचा पर्याय पवार यांनी सुचवला आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा पर्यायही विचारात असल्याचे त्यांनी सांगितले. पण अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री आणि पक्षात चर्चा करून होईल असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

परमबीर सिंग यांच्या पत्रात १०० कोटी रूपये कोणाला दिले याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे आपले पद गेल्यावरच झालेले आरोप केल्याचे शरद पवारांनी सांगितले. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. पण या आरोपामध्ये केलेल्या पत्रावर स्वाक्षरी नसल्याचेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाला मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असल्याचेही पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button