राजकारण

अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ‘ईडी’ची कोठडी

मुंबई – १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल १३ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अखेर अटक करण्यात आली आहे. आज त्यांना सत्र न्यायालयात विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत आदींची कोठडी सुनावली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.

अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. यानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे.

सचिन वाझे ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ‘ईडी’समोर जाण्याचा मुहूर्त का काढला? : मुनगंटीवार

राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून, सचिन वाझे हे महाराष्ट्र पोलीस आणि एसआईटी च्या ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ईडी च्या समोर जाण्याचा मुहूर्त का काढला, असा थेट सवाल केला आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून, अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खरं आहे देर आए दुरूस्त आए. एक गृहमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारीचा निर्वाह केला, त्यांनी एक आदर्श प्रस्थापित करायला हवा होता. अनिल देशमुख नेहमी पोलीस अधिकाऱ्यांसोबत किंवा जनतेसोबत संवाद साधताना सागंयाचे की, पोलिसांनी एखादा खोटा गुन्हा दाखल केला तर त्यासंदर्भात आपली बाजू मांडली पाहिजे. कायदा तुमच्या बाजूने उभा आहे. मग जे वाक्य अनिल देशमुख दुसऱ्यांना सांगायचे, त्यांनाच असे अचानक काय झाले, अशी विचारणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

ज्या मुद्द्यासंदर्भात लक्ष वेधू इच्छितो की सचिन वाझे आता महाराष्ट्राच्या एसआयटीच्या सुपूर्द झाला आहे. कदाचित अनिल देशमुखांना असे वाटत असेल, आता सचिन वाझे आपण सांगू त्या पद्धतीने एसआयटी त्याच्याकडून कबूल करून घेईल आणि म्हणून आता जर ईडीच्या समोर गेलो तर आता धोका नाही. हे असण्याची शक्यता आहे. असा मुहूर्त का काढला? सचिन वाझे महाराष्ट्र पोलीस व एसआयटीच्या ताब्यात आल्याबरोबर अनिल देशमुख हे ईडीच्या समोर आले. इतक्या दिवस कुठे होते? याचे उत्तर शेवटी अनिल देशमुख यांनी दिले पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button