अनिल देशमुख अचानक दिल्लीला रवाना

मुंबई : मुंबईतील बारमालकांकडून १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून वादात सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख सकाळीच दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. ईडीने पाठविलेल्या समन्समुळे देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल देशमुखांच्या घरी छापे मारले होते. यानंतर ईडीने त्यांना तीन समन्स पाठविले होते. यासाठी गेल्या मंगळवारी त्यांना सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली. तसेच वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत मंगळवारी अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. अनिल देशमुख यांच्या वकीलांनी ईडीकडे ८ दिवसांची मुदत मागितली आहे.
आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या तपशिलासह सहा मुद्द्यांवर सविस्तर तपशील मागितला आहे. त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रांनिशी पुढील चौकशीवेळी हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अनिल देशमुख आज दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते ईडीच्या नोटिशीविषयी कायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी गेले आहेत की सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी ते अद्याप समजलेले नाही.