अनिल देशमुख यांना ५० हजारांचा दंड; न्यायालयीन कोठडीत २७ डिसेंबरपर्यंत वाढ

मुंबई : १०० कोटी खंडणी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने त्यांच्या कोठडीमध्ये २७ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. अनिल देशमुखांनी पैशांची मागणी केली नसल्याचा जबाब सचिन वाझेने चांदिवाल आयोगासमोर दिला. पण, देशमुखांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. त्यातच, आता अनिल देशमुख यांना चांदीवाल योगाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगाने ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. देशमुखांचे वकील गैरहजर असल्यामुळे त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या उलट तपासणीवेळी ते गैरहजर होते. विशेष म्हणजे दंडाची ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. दरम्यान, १०० कोटी रूपये प्रती महिना खंडनी वसुलीचे कथित आदेश दिल्या प्रकरणी चांदीवाल आयोग देशमुखांची चौकशी करत आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटींची खंडणी जमा करायला सांगितल्याचा आरोप केला होता. पण, आता या खंडणी प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुख यांना क्लीन चीट देत देशमुखांनी कधीही पैशांची मागणी केली नाही, असा जबाब चांदिवाल आयोगासमोर नोंदवला आहे. हा जबाब म्हणजे, अनिल देशमुखांना क्लीनचीट असल्याचे म्हटले जाते. पण अद्यापही २७ डिसेंबरपर्यंत देशमुख यांना न्यायालयीन कोठडीतच राहवे लागणार आहे.