चौकस अपेक्षित हवे होते, पण महाराष्ट्राला लाभले ‘चौकशीकार’ गृहमंत्री; भाजपचा हल्लाबोल

मुंबई – धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख अशा विविध प्रकरणावरून विरोधी पक्ष भाजपाने ठाकरे सरकारची कोंडी केली, धनंजय मुंडे, मेहबुब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप तर संजय राठोड यांच्यावर कथित प्रेमसंबंधातून २२ वर्षीय युवती पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला, यातच आता भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यात काही झालं तरी चौकशी करू हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्य झालं आहे, महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र वास्तावात ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभले, सत्ताधारी पक्षातील नेते असाल तर तुमच्या चौकशीचे पुढे काही होत नाही, ती प्रलंबितच राहते असा आरोप भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुखांवर केला आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे आरोप असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना चौकशीकार गृहमंत्र्यांनी केवळ चौकशी करू असे बोलून क्लीनचिटच दिली, मेहबूब हे राष्ट्रवादीला एवढे प्रिय आहेत की, त्यांनी केक भरवल्याशिवाय जयंत पाटलांचा वाढदिवस होत नाही असंही भाजपाने म्हटलं आहे.
इतकच नाही तर सोशल मीडियावर टीका केली म्हणून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभियंत्र्याला निवासस्थानी बोलावून मारहाण केल्याचा आरोप झाला होता, या प्रकरणी चौकशीही प्रलंबितच आहे, पक्षप्रेमापोटी अशा अनेक प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असावी.
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या चौकशीचे पुढे काय झाले? हे केवळ गृहमंत्र्यांनाच माहिती आहे, सीरमला लागलेली आग हे कोणाचे षडयंत्र होते की फक्त अपघात याची चौकशीही प्रलंबितच राहिली असा चिमटाही भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुखांना काढला आहे.
त्याचसोबत देशाच्या आर्थिक राजधानीत १२ ऑक्टोबरला वीज पुरवठा अचानक खंडित झाला, राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर सवयीप्रमाणे चौकशीकार गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले, याही प्रकरणाची चौकशी अद्याप प्रलंबितच आहे असंही भाजपाने म्हटलं आहे. या संदर्भात भाजपाने ट्विटरवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग करून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.