मनोरंजन

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांचा डंका

‘आनंदी गोपाळ’, ' बार्डो'ला पुरस्कार

मुंबई : 67 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. (67th National Film Awards) नुकतंच बार्डोनं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता ‘आनंदी गोपाळ’ (Anandi Gopal) या चित्रपटाची देखील राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये वर्णी लागली आहे. सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांच्या विभागात ‘आनंदी गोपाळ’नं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. सोबतच सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईनसाठी देखील या चित्रपटाला पुरस्कृत करण्यात आलं आहे.

वर्षभरात प्रदर्शित झालेल्या देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मनोरंजन सृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं गेल्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा एक वर्षानंतर साजरा केला जात आहे. हा पुरस्कार डायरेक्टोरेट ऑफ फ़िल्म फेस्टिवल या संस्थेतर्फे दिला जातो. ही संस्था माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत काम करते. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जीवनप्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या. अन् त्यांनी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. ज्या शतकात स्त्रियांना उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, त्या एकोणिसाव्या शतकात आनंदी गोपाळ जोशी अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्या होत्या. चार वर्ष परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर भारतात परतल्या. त्यांचा हा जीवनप्रवास ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button