साहित्य-कला

मल्लाळमध्ये सापडला ९०० वर्षापूर्वीचा चालुक्य सम्राट विक्रमादित्याचा शिलालेख

मिरज इतिहास मंडळाचे संशोधन

जत (दिनराज वाघमारे) : जत तालुक्यातील मल्लाळ येथे डोंगरावर जमीन नांगरत असताना चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकीर्दीतील शिलालेख सापडला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्राध्यापक गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे. सन ११२० मध्ये एका शिवमंदिरासाठी जतचा प्रमुख दंडनायक बंकेय याने मल्लाळ येथील दहा मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. या शिलालेखातून चालूक्यसम्राट विक्रमादित्य याच्या कारकीर्दीतील नवी माहिती उजेडात आली आहे.

जत तालुक्याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. या तालुक्याच्या विविध गावात चालुक्य, कलचुरी, यादव यांच्या राजवटीतील शिलालेख आढळून आले आहेत. मल्लाळ हे गाव जतपासून सुमारे चार किलोमीटरवर आहे. या गावच्या दक्षिणेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरावर खडकाळ जमीन आहे. यापैकी दीपक माने यांची जमीन नांगरत असताना भगवान काळे यांना एक मोठा दगड आढळून आला. या दगडावर शिवलिंग, गाय-वासरू, कट्यार, सुर्य चंद्राचे शिल्पांकन होते. खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर होता. याची माहिती मारूती ओलेकर व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण ओलेकर यांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांना दिली. त्यांनी सदर ठिकाणी जाऊन शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला.या शिलालेखात एकूण १३ ओळी आहेत. या शिलालेखाचे वाचन हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे शिलालेखशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कलवीर मनवाचार यांनी करून दिले. या वाचनासाठी महेंद्र बोलकोटगी (जमगी) यांचेही सहकार्य लाभले. या शिलालेख अभ्यासासाठी सागर कांबळे, विलास हराळे, बिराप्पा बंडगर, कल्लापा माने यांचीही मदत झाली.

या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्य याचा उल्लेख आला आहे चालूक्य विक्रमादित्य हा महापराक्रमी होता. त्याने ५० वर्षे राज्य केले. त्याच्या काळात चालुक्य राज्याच्या सीमा गुजरातपासून दक्षिणेत तामीळनाडू पर्यंत भिडल्या होत्या. त्याच्या काळात कला, विद्या यांचा मोठा विकास झाला. चालुक्य सम्राट विक्रमादित्य हा इसवी सन १०७६ मध्ये गादीवर आला. त्याने आपल्या राज्यारोहणानिमित्त स्वतःच्या नावाचा चालुक्य विक्रम शक सुरू केला. कराडच्या शिलाहर राजवंशातील चंदलादेवी ही विक्रमादित्याची महाराणी होती. कराडमध्ये झालेल्या स्वयंवरात तिने विक्रम राजाला पती म्हणून निवडले होते. पश्चिम महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या चालुक्य सम्राट विक्रमादित्याच्या काळात अनेक मंदिरे बांधली गेली. त्या मंदिरांसाठी जमीनी दान देण्यात आल्या. त्यासंबंधी अनेक शिलालेख उपलब्ध आहेत. मल्लाळ येथे सापडलेला हा शिलालेख सांगली जिल्ह्यात विक्रमादित्याचा सापडलेला कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे.

काय आहे शिलालेखात?
मल्लाळ येथे सापडलेल्या या शिलालेखात चालुक्य विक्रम शक ४५ शार्वरीनामसंवत्सरे, भाद्रपद शुद्ध पंचमी सोमवार या दिवशी जत येथील प्रमुख दंडनायक बंकेय याने शिव मंदिरासाठी १० मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख या लेखात आहे. हा लेख १ ऑगस्ट सन११२० रोजी लिहिला गेला आहे. या लेखात उल्लेख केलेला जतचा प्रमुख बंकेय याने जतमध्ये बांधलेल्या शिवमंदिराला बंकेश्वर या नावाने ओळखले जाते. जत आणि परिसरात या दंडनायकाचे प्रभुत्व असल्याचे या शिलालेखावरून दिसते. या शिलालेखात त्याच्या विशेषणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button