राजकारण

दिल्लीत उद्धव ठाकरे- पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट; महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अमोल मिटकरी यांची टीका

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण या महत्त्वाच्या विषयासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील राजकीय पक्षही या भेटीतीळ चर्चेकडे लक्ष ठेवून आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ठाकरे-मोदी भेटीवरुन भाजपवर निशाणा साधला. अमोल मिटकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

याशिवाय अमोल मिटकरींनी दुसरं ट्विट करुन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरही घणाघात केला. “अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर बोलायला लागले.अर्थ स्पष्ट आहे भाजपा मानसिकदृष्ट्या थकलेला पक्ष झाला आहे. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरे त्यांच्याकडे काही शिल्लक नाही”, असं मिटकरी म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button