राजकारण

मनोबल खचलेल्या भाजप कार्यकर्त्यांना सावरण्याचा अमित शाहांचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात

मुंबई: भाजप नेते अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आमच्यावर टीका केली. अलिकडे भाजपचे सर्वच नेते कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत. अमित शाह यांनीही मनोबल खचलेल्या भाजप कार्यकर्त्यांना सावरण्याचा प्रयत्न केलाय, असा टोला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत हा टोला लगावला आहे. अलिकडे भाजपचे सर्व नेते त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत. त्यामुळेच चंद्रकांत पाटील भाजप ४५ वर्षे सत्तेत राहील असं सांगत आहेत. देवेंद्र फडणवीसही ज्याला राजकारण कळतं ते भाजपमध्ये राहतील असं म्हणत आहेत. राज्यात भाजपची अधोगती सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल संपलेले आहे, नैराश्य आले आहे. भाजप कार्यकर्त्यांना नैराश्यातून सावरण्याचा हा प्रयत्न आहे, असं सांगतानाच आमचे सरकार चांगले काम करतंय. पुढील निवडणुकीतही भाजपला दूर ठेवण्याचं काम आम्ही करणार आहोत, असं थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी सहकार चळवळीवरही भाष्य केलं. सहकार हा विषय राज्यात चांगल्या पद्धतीने राबवला आहे. राज्यात समृद्धी दिसतेय. त्यात सहकाराचा वाटा आहे, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी राज्याला लवकरच विधानसभा अध्यक्ष मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. या अधिवेशनात काँग्रेसला नवा विधानसभा अध्यक्ष मिळेल आणि तो काँग्रेसचाच असेल. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींशी चर्चा करून नाव ठरवलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एसटीचे विलीनीकरण अशक्य

एसटी संपावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. परिवहन मंत्री अनिल परब या विषयावर चांगलं काम करत आहे. ते आमच्याशी आणि मुख्यमंत्र्यांशी बोलत असतात. एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नाही हे दिसतंय. तो विषयही कोर्टात आहे. कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा आणि कामावर यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button