Top Newsराजकारण

फडणवीसांचा ड्रग्स पेडलर्सशी संबंधांचा आरोप आणि रंगलेली राजकीय जुगलबंदी

मुंबई : मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे गौप्यस्फोट करत असलेल्या नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आज सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करून मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी हा आरोप केला आहे. मलिक यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईमध्ये फडणवीस यांच्या आदेशाने ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणे आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी आम्हाला शंका आहे, असेही मलिक म्हणाले.

दरम्यान, या सगळ्या खेळामध्ये प्रतीक गाभा हा मुख्य खेळाडू असून, त्याच्याबाबत उलगडा लवकरच करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा सचिन वाझे असून, त्याचा उद्धव ठाकरेंशी संबंध नाही. मात्र युती सरकारमध्ये भाजप आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर नीरज गुंडे फडणवीस यांचा निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे जात होता, असा दावा मलिक यांनी केला.

विटेला दगडाने उत्तर मिळेल : फडणवीस

सध्या तुरुंगात असलेल्या जयदीप राणाशी फडणवीस यांचे काय संबंध आहेत, असा सवाल मलिक यांनी विचारला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. फडणवीस म्हणाले की, दिवाळीच्या सुरुवातील लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. ते सध्या कोणत्या मानसिकतेमध्ये आहेत, हे सर्वांना माहिती आहे. जो फोटो त्यांनी याठिकाणी दाखवला आहे त्याबाबत कालच रिव्हर मार्चने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या क्रिएटिव्ह टिमने हायर केलेला हा माणूस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चार वर्षांपूर्वीचा फोटो आज सापडला आहे आणि रिव्हर मार्च ही संघटना आहे. ती मुंबईत नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काम करते. त्याचे अध्यक्ष असलेले चौगुले यांनी आम्हाला विनंती केली होती. त्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडलो गेलो होतो. त्यावेळी त्यांनी जे काही गाणं तयार केलं गेलं होतं. तेव्हा हे फोटो काढण्यात आले होते. त्यात माझेही फोटो होते. मात्र जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचे फोटो ट्विट केले गेले. यामागील मानसिकता स्पष्टपणे दिसते. याबाबत रिव्हरमार्चनेच स्पष्टीकरण दिले आहे. की त्यांच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारांशी त्याचा संबंध नाही आहे. तसेच तेव्हा जेव्हा तिथे जे लोक आले होते. ते रिव्हरमार्चकडून आले होते. त्यांचा माझ्याशी किंवा माझ्या पत्नीशी दुरान्वयेही संबंध नाहीस असे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी ड्रग्स प्रकरणाशी भाजपाचा संबंध जोडणाऱ्या मलिकांनाही फडणवीस यांनी उत्तर दिले. ज्या प्रकारे एका व्यक्तीवरून भाजपाचं ड्रग्स कनेक्शन असल्याचं सांगत आहेत. आता नवाब मलिक यांचा जावई ड्रग्ससकट सापडला होता. त्यामुळे नवाब मलिक यांचाच रेश्यो लावला तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसलाच ड्रग्स माफिया म्हटलं पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

मी काचेच्या घरात राहत नाही. सुरुवात नवाब मलिकांने केली आहे. त्यामुळे आता शेवट करावाच लागेल. विटेला दगडाने उत्तर कसं द्यायचं हे मी जाणतो. मी पुराव्याविना आरोप करत नाही, तसेच मला पुरावे मागेही घ्यावे लागत नाहीत, असे आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

अवघ्या ३ शब्दात अमृता फडणवीसांचा मलिकांवर निशाणा

मलिकांनी सकाळी ट्विटरवर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला. त्यानंतर भाजपचे ड्रग्स पेडलरशी काय कनेक्शन? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नवाब मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलंय की, चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असते. असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.

दिवाळीनंतर बॉम्ब फोडू; मुख्यमंत्र्यांनी दोन वाक्यात विषय संपवला !

क्रूझवरील ड्रग्स पार्टीवरून एनसीबी विरुद्ध एनसीपी असा सुरू असलेला संघर्ष आता वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. भाजपमधील नेत्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांना फडणवीस दाम्पत्यानं प्रत्युत्तर दिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दांत फडणवीसांना टोला लगावला आहे. दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली आहे. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला. त्यावर मुख्यमंत्री ठाकरेंनी भाष्य केलं आहे. काही जण म्हणतात दिवाळीनंतर बॉम्ब फोडू. मी पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटतील, याची वाट पाहतोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. राजकीय फटाक्यांसाठी दिवाळीची गरज नाही, असंही ते म्हणाले.

फडणवीसांनी शरद पवारांऐवजी मुंबई पोलिसांकडे पुरावे द्यावेत !

नवाब मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पुरावे आपण दिवाळीनंतर शरद पवार यांच्याकडे सोपविणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या आरोपावरही आता प्रतिक्रिया येत आहेत. त्याला आता नवाब मलिक यांनीही प्रत्युत्तर दिले असून, है तैयार हम असे केवळ तीन शब्दांचे ट्विट केले. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. तर, फडणवीस यांच्या आरोपानंतर उद्योजक आणि विश्लेषक तहसीन पुनावाला यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित आहेत, तर दिवाळीची वाट पाहण्याऐवजी किंवा शरद पवार यांच्याकडे तक्रार करण्याऐवजी, फडणवीस यांनी मुंबई पोलिसांकडेच पुरावे सादर करणे त्यांचे कर्तव्य आहे, असे तहसीन पुनावाला यांनी म्हटलंय. तसेच, साहजिकच ते केवळ बडबड करत आहेत, असेही पुनावाला यांनी ट्विट करुन म्हटलंय.

है तैयार हम : मलिक यांचेही फडणवीसांना प्रत्युत्तर

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याला आता मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले असून, ‘है तैयार हम’ असे केवळ तीन शब्दांचे ट्विट केले. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.

मलिकांच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचाराची आवश्यकता : प्रवीण दरेकर

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखे दिसत असून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता असल्याची खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. नवाब मलिकांनी मंत्री म्हणून संविधानातील गुप्ततेच्या अटीचा भंग केला असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणीही दरेकरांनी केली आहे.

दरेकरांनी म्हटलं आहे की, नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो आहे. कारण रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा, ट्विट करायचे आणि सनसनाटी निर्माण करायची आशा प्रकारची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. मंत्री म्हणून शपथ घेताना संविधानाने ज्या काही चौकट आणि अटी गुप्ततेच्याबाबतीत घातल्या आहेत त्याचा भंग होताना दिसत आहे. वैयक्तिक आरोप, जतीवर बोलण हे भंग असल्याचे माझे मत आहे. आशा प्रकारे गुप्ततेचा भंग या सगळ्या गोष्टीचा विचार करुन नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण समीर वानखेडे मुस्लिमच आहे. असा अट्टहास कशासाठी पाहिजे. नवाब मलिक यांनी शपथ घेतल्याचा भंग केला असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

फडणवीसांवरील आरोपांचे परिणाम नवाब मलिकांना भोगावे लागणार : चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचा परिणाम भोगावा लागणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. राज्यातील विषयांवर नागरिकांचे दुर्लक्ष करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते बेछूट आरोप करत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच राज्य सरकारकडे यंत्रणा आहेत त्यांनी चौकशी करावी असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेते बेछूट आरोप करत आहेत. त्यांना समीर वानखेडेंवर आरोप करायचे असतील तर आरोप करताना परिणामांची काळजी करावी पण भाजपला यामध्ये ओढण्याचे आणि फडणवीसांना ओढण्याचे परिणाम खूप भोगावे लागती असा इशारा पाटील यांनी दिला. तसेच याचे कारण पुराव्याशिवाय आपण बोलतो त्यावेळी पुरावे सापडले नाही तर जी स्थिती होती ती फार वाईट असते असे चंद्रकांत पाटील यांनी म्ह्टलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button