
असं म्हणतात की, मित्र निवडता येतात, (काही भाग्यवंतांना तर मैत्रिणीसुद्धा निवडता येतात म्हणे ! या ‘म्हणे’ वरून अस्मादिक त्या कॅट्यागिरीपासून किती दूर असावेत याचा सहज अंदाज यावा.) पण नातेवाईक काही निवडता येत नाहीत. ते नशिबाने मिळतील तसे स्वीकारावे लागतात आणि सहनसुद्धा करावे लागतात.तसा एखादा नातेवाईक निवडण्याची संधी आपल्याला मिळते. काही भाग्यवंतांना तर ती दोनदा, तीनदासुद्धा मिळते ! (आपलं कुठे आलंय तितकं भाग्य ?) चॉइसेसही भरपूर असतात, पण तरी बहुतेकांचा चॉईस चुकतोच चुकतो. मोबाईल, बाईक आणि कारच्या बाबतीतही बहुतेकांचं तसंच तर होतं ! मग काय, आयुष्यभर नुसतं ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.’ जाऊ द्या. आलिया भोगासी…. दुसरं काय?
जसे नातेवाईक निवडता येत नाहीत तसेच शेजारी तरी कुठे निवडता येतात ? भाड्याचं घर घेतांना काही माणसं ( हो. हो. माणसचं . बायका नाही.) शेजारी कोण राहतं याचा झटपट अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात. झटपट यांच्यासाठी म्हणायचं की, बाईसाहेब किचन किती मोठं आहे, किचनचा ओटा किती मोठा आहे, सामान ठेवायला कपाटं किती आहेत, याचा अंदाज घेईपर्यंत नवरोबांना व्हरांडा किती मोठा आहे, ग्यालरी किती मोठी आहे हे बघण्याचं कारण करून शेजारी पाजारी, समोर कोण राहतं याचा झटपट अंदाज घ्यावा लागतो. त्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. बाईसाहेब तिथे येईपर्यंत हे सर्व बेमालूमपणे आटोपायचं असतं. या खटपटीत एखादं ‘ प्रेक्षणीय स्थळ’ जर नजरेस पडलं तर नवरोबांना तेच घर फायनल करायचं असतं, पण नेमकं बाईसाहेबांना ते घर छोटं, कोंदट वाटतं म्हणून ते नाकारलं जातं. शेवटी बरेच दिवस फिरून, अर्ध गाव पालथं घालून, बाईसाहेबांच्या पसंतीने जे घर भाड्याने घेतलं जातं, तिथे शेजारचं घर नेमकं कॉलेजच्या मुलांना कॉट सिस्टिमने तरी दिलेलं असतं किंवा पडकं म्हणून रिकामं तरी ठेवलेलं असतं.जाऊ द्या. आलिया भोगासी – – -. दुसरं काय ?
कोणी कितीही आटापिटा केला तरी शेवटी नशिबात असेल तोच शेजारी मिळतो. ( आणि नशिबात नसेल, ती शेजारीण मिळतच नाही !) आमच्या एका मित्राने असंच एक ‘ प्रेक्षणीय स्थळ’ शोधलं आणि ( बजेटमध्ये बसत नसतांनासुद्धा ) मोठं डिपॉझिट देऊन शेजारचं घर भाड्याने घेतलं. प्रत्यक्षात त्या घरात राहायला गेल्यावर कळलं की, त्या घरात फक्त पंच्याहत्तर वर्षांचे आजोबा आणि सत्तर वर्षांच्या आजीच राहतात. ते ‘प्रेक्षणीय स्थळ’ आठ दिवसांसाठी दिल्लीहून आलं होतं आणि अजून निदान तीन चार वर्ष तरी परत येणार नाही. आता आमचे मित्र शेजारधर्म पाळायचा म्हणून आजी आजोबांची औषधे आणून देणे, अधूनमधून भाजीपाला आणून देणे असली कामं करीत असतात . जाऊ द्या. आलिया भोगासी… दुसरे काय ?
सगळेच नशिबाचे खेळ असतात बघा. समोरच्या घरात सायराबानोसारखी ‘पडोसन’ लाभण्यासाठी सुनील दत्त सारखं नशीब असावं लागतं. कुठून आणणार ? शेजारच्या घरात आपण स्वप्नातही आणू शकत नाही , अशी ‘सपना’ रती अग्निहोत्री लाभण्यासाठी ‘एक दुजे के लिये’ मधल्या कमल हसन सारखं नशीब असावं लागतं . कुठून आणणार ? ‘ भाभीजी घरपर है’ मधल्या भाभीजींसारख्या भाभीजी शेजारी म्हणून लाभण्यासाठी ‘विभू’ किंवा ‘ तिवारीजीं’ सारखं नशीब असावं लागतं. कुठून आणणार ? या पुण्यात्म्यांनी गेल्या जन्मी कोणती पुण्यकर्मे केली असतील आणि आपण कोणती पापकर्मे करत बसलो असू, हे कोण सांगणार ? बरं असा योग नशिबात यावा म्हणून नारायण नागबली सारखा एखादा विधी आहे का हे कोणाला विचारताही येत नाही. ( बायको सोबतच असते !) आवडत्या मुलीशीच लग्न करता यावं म्हणून जशी तिच्या कुंडलीशी जुळणारी कुंडली बनवून घेता येते, तसं काही यासाठी करण्याची सोयही नाही. जाऊ द्या. आलिया भोगासी… दुसरं काय ?




