अजित पवारांच्या मामाचा साखर कारखाना जप्त; ‘ईडी’ची कारवाई
मुंबई : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं आहे. यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवार आणि ६५ जणांना क्लीन चिट दिली होती. मुंबईच्या सेशन्स कोर्टात मागील वर्षी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र या निकालाला माजी मंत्र्यांसह पाच जणांनी आव्हान दिलं होतं. सुरेंद्र मोहन अरोरा, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिकराव जाधव यांच्यासह आणखी दोघांनी प्रोटेस्ट याचिका दाखल केली होती.
२५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती.