
मुंबई : विधीमंळाचं हिवाळी अधिवेशन यंदा जनतेच्या प्रश्नांच्या तुलनेत कुत्र्या-मांजरांच्या आवाजानेच जास्त गाजलं. हा सर्व प्रकार अत्यंत लज्जास्पद असल्याचे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांचे कान टोचले. ज्या लाखो मतदारांनी विश्वास टाकल्यानंतर आमदार इथपर्यंत पोहोचतात, त्यांनी हे लक्षात ठेवावे की, आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाहीत. असे वागलात तर लाखो मतदारांच्या विश्वासाला तडा जाईल. सदस्यांनी आपण काय बोलतोय, याचे भान ठेवा, असे खडे बोल अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना सुनावले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आपण इथे कुत्री, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे. प्राण्यांचा आवाज काढणं हा मतदारांच्या विश्वासाला तडा जाणं आहे. त्यांचा अपमान करणं आहे. मतदारांना काय वाटेल, आपला माणूस तिथं जातो आणि अशा पद्धतीनं आवाज काढतो, टवाळी करतो? त्यामुळे सगळ्यांनीच चारही प्रमुख प्रक्ष, इतर अपक्ष सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्यानं घेतली पाहिजे.
गेल्या काही दिवसांपासून आमदारांच्या बेताल वक्तव्यांबद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, विधीमंडळाचा सदस्य सभागृहात कसा वागतो, कसा बोलतो, आवारात त्याचं वर्तन कसं आहे. सार्वजनिक जीवनात कसा वावरतो, या सगळ्यावर त्याची स्वतःचीच नाही तर विधीमंडळाची प्रतिमा ठरत असते. याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. गेल्या काही वर्षात सभागृहातील सदस्यांच्या वर्तनामुळे आपल्या सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच धक्का पोहोचला आहे. ही प्रतिमा आणखी ढासळू नये, तिला उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
इतकी वर्ष आमदार असून आम्हाला जे समजत नाही, ते यांना कधी कळायला लागलं !
अध्यक्ष महोदय, आमदार होऊन इतकी वर्ष झाली. आम्हालाही काही गोष्टी समजत नाहीत. मात्र, काही जण आमदार झाल्यावर सगळं समजतंय असं वागतात, अशा शब्दांत संतप्त झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधिमंडळात आमदारांची खरडपट्टी काढली.
अजित पवार म्हणाले की, सभागृहाच्या आवारात आणि आपल्या सार्वजनिक जीवनातील वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. सकाळी बैठक झाली. या बैठकीला सत्ताधारी आणि विरोधक होते. सगळ्यांनीच सभागृहातील सदस्यांच्या वर्तनात सुधारणा झाली पाहिजे यावर सर्वांनी मत व्यक्त केलं. सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून चिंता व्यक्त केली. सदस्यांना वर्तनाची जाणीव करून देण्यावरही सहमती दर्शवली. आम्ही 30 वर्षांपूर्वी आलो. बाळासाहेब थोरात ३५ वर्षांपूर्वी आले. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा लाईव्ह जात नव्हतं. आता लाईव्ह जात आहे. त्यामुळे सदस्यांचं वर्तन चांगलं पाहिजे. कुणाचा अपमान होणार नाही, कुणाचा उपमर्द होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मी नेहमीच सडेतोड बोलतो. मी कोणताही पक्ष पाहत नाही. संसदीय सदाचार आणि शिष्टाचाराची आचारसंहिता हे पुस्तक सर्वांना दिलं. ते सर्वांनी वाचलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे!
अजित पवार म्हणाले की, सुरुवातीला मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता तर आमच्या सीटवर कोणीही येऊन बसतो. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरही येऊन बसतात. त्यांना म्हटलं तेवढी तरी राहू दे. तुला १४५ आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस. पण सदस्य ऐकत नाहीत. कॅबिनेटमंत्री पुढे बसायचे. आम्ही पाठी बसून त्यांच्याशी बोलायचो. त्यांना सभागृहात डिस्टर्ब करायचो नाही. आता एक पत्र दिल्यावर दहा मिनिटाने दुसरं पत्रं देतात. अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा. पण सर्वांनी शिस्त पाळा. क्रॉसिंग तर कुणाला कळत नाही. कोण कुठं उभं आहे, काय आहे हेच माहीत नाही. कसंही क्रॉसिंग केलं जातं. तिथं तर बऱ्याचदा बोलत असतात. इथं कोण तरी बोलत असतात. अध्यक्षांकडे पाठ असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यावर त्यांना नमस्कार करून बसायचे असते. जातानाही नमस्कार करायचा असतो, असा डोसही अजितदादांनी पाजला.
अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते
सभागृहातील शिस्तीवरही त्यांनी भाष्य केलं. पूर्वी कॅबिनेटमंत्री पुढे बसायचे. आम्ही पाठी बसून त्यांच्याशी बोलायचो. त्यांना सभागृहात डिस्टर्ब करायचो नाही. आता एक पत्र दिल्यावर दहा मिनिटाने दुसरं पत्रं देतात. अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा. पण सर्वांनी शिस्त पाळा. क्रॉसिंग तर कुणाला कळत नाही. कोण कुठं उभं आहे… काय आहे… हेच माहीत नाही. कसंही क्रॉसिंग केलं जातं. तिथं तर बऱ्याचदा बोलत असतात. इथं कोणतरी बोलत असतात. अध्यक्षांकडे पाठ असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यावर त्यांना नमस्कार करून बसायचे असते. जातानाही नमस्कार करायचा असतो एवढी साधी गोष्टही त्यांना कळत नाही, असंही ते म्हणाले.
१२ आमदारांच्या निलंबनावर अजित पवार भाजपसोबत?
कुणी जर चुकलं, तर त्याला ४ तास बाहेर ठेवा. ४ तास कमी वाटत असतील, तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम १२-१२ महिने कुणाला बाहेर पाठवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना केले. यापूर्वी भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन झाले आहे. हे निलंबन मागे घ्यावे, अशी भाजपची मागणी आहे. या अनुषंगाने अजित पवारांनी सभागृहात आज भाजपच्या सुरात सूर मिसळला. त्यामुळे सभागृहातील अनेकांच्या भुवया उंचावल्या.
संसदीय सदाचार आणि शिष्टाचाराची आचारसंहिता यावरील पुस्तक सर्वांनी वाचावं असा सल्ला यावेळी अजित पवार यांनी सर्व आमदारांना दिला. ते म्हणाले, आपण सर्वांनी सभागृहाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विधीमंडळाच्या आवारात, सार्वजनिक जीवनातील स्वतःच्या वर्तनात अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. सकाळच्या बैठकीला सदस्यांच्या वर्तनात सुधारणा झाली पाहिजे यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, थोरात, अनिल परब, जयंत पाटील अनेक गटनेत्यांनी सहमती दर्शवली. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सभागृहाचं कामकाज. विधीमंडळाचं थेट प्रक्षेपण जगभरात होत असतं. त्यामुळे विधीमंडळाच्या सदस्याचं वर्तन शोभेल, साजेल, इतर कुणाचा अपमान, अवमान, उपमर्द होणार नाही, असं ठेवलं पाहिजे. संसदीय सदाचार, शिष्टाचाराची आचारसंहिता हे पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे.’




