राजकारण

नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी एल्गार, आज १ लाख आंदोलकांची ‘सिडको’वर धडक !

नवी मुंबई, : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा आता चांगलाच चिघळला आहे. दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले असून आज आपला आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी पुढे येत होती. त्यामुळे आज आंदोलकांनी सिडको कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आंदोलनाची तयारी केली आहे. नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, रायगड सोबतच ठाणे आणि पालघरमधून आंदोलन करण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. कोरोना संसर्ग महामारीचे कारण पुढे करत पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. रायगड, ठाणे आणि पालघरमधून तब्बल १ लाख आंदोलनकर्ते नवी मुंबईत येणार आहेत. या सर्व आंदोलनकर्त्यांना नवी मुंबईतील पामबीच मार्गावर अडवण्यात येणार आहे.

तिन्ही जिल्ह्यातील गावागावांमधून हे आंदोलन पेटल्याने नवी मुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबईकडून पुणे आणि कोकणाकडे जाणारी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे.

नवी मुंबईत येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांची वाहतूक पुर्णत: बंदी तसेच सायन पनवेल मार्गावरुन सीबीडी मार्गे पुण्याकडे तसेच मुंबईकडे जाणाऱ्या-येणाऱ्या दोन्ही मार्गांवर उरणफाटा ते खारघर दरम्यान तसेच सीबीडी सर्कलकडे येणारे रस्ते २४ जून २०२१ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवेश बंधी घोषित करण्यात आले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांकडून महामोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रकप्लग्रस्तांना नोटीसही बजावली आहे. आम्ही कोविड नियमांचे पालन करुनच आंदोलन करणार असल्याचं कृती समितीच्या सदस्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button