नाशिक जिल्हा बँक (NDCC Bank) वाचविण्यासाठी प्रशासकांनी आक्रमक भूमिका घेण्याची गरज : अनास्कर
राजकारणाची कथा, जिल्हा बँकेची व्यथा - भाग २

कठोर निर्णय घेऊन दोषींवर कारवाई केली तरच बँकेच्या कारभारात सुधारणा !

आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक असताना राज्य सरकारने बँकेचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची सनियंत्रण समिती नेमली आहे. ही समिती प्रशासकांकडून बँकेच्या कामकाजाचा आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी संचालक मंडळास मार्गदर्शन करेल असे सांगण्यात आले होते. नियमबाह्य कर्जवाटप, विविध खरेदींमधील भ्रष्टाचार, चुकीचे निर्णय अशा अनेक कारणांमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आहे. प्रशासक आणि संचालक मंडळाला मार्गदर्शन करण्यासाठी तसेच ठेवीदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी सहकार विभागाने ही सनियंत्रण समिती नेमली. या संदर्भातील शासन निर्णय २० सप्टेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आला.
या सनियंत्रण समितीत पुणे येथील सहकारी संस्थेचे अतिरिक्त आयुक्त आणि विशेष निबंधक, सेवानिवृत्त अतिरिक्त निबंधक सुनिल पवार, नाशिकच्या सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे विभागीय व्यवस्थापक आणि जिल्हा उपनिबंधक यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. या समितीत श्री. अनास्कर यांचा समावेश व्हावा आणि या बँकेला पूर्वीचा गौरव प्राप्त व्हावा असा प्रयत्न झाला होता. मात्र नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होणारा राजकीय हस्तक्षेप, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लागेबांधे या पार्श्वभूमीवर श्री. अनास्कर यांनी या समितीत सामील होण्यास स्पष्टपणे नकार दिला. यापूर्वी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सक्षमीकरण तसेच बँक कामकाजाचे नियमित सनियंत्रण करण्यासाठी वर्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. त्यावेळी श्री. अनास्कर यांना आलेला अनुभव हा अत्यंत वाईट असल्यानेच त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सनियंत्रण समितीपासून स्वत:ला चार हात दूर ठेवले.
जिल्हा बँकांच्या सक्षमीकरणाबाबत सहकार विभागामार्फत सुरु असलेल्या विविध उपाययोजनांची फलनिष्पत्ती विचारात घेऊन नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमीकरणासाठी सनियंत्रण समिती नियुक्त केली असली तरी आजपर्यंत याबाबत काही यश मिळाल्याचे दिसून येत नाही. बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीचा आढावा घेऊन कर्ज वसुलीला गती देण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम ही समिती करणार होती. बँकेच्या ठेवीमध्ये वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यासोबत ठेवीदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करून ठेवी वाढविण्यावर भर देण्याचा उद्देश होता. बँकेचा व्यवसाय वाढवणे आणि खर्चात कपात करून बँकेच्या आर्थिक व्यवहारात पूर्णपणे पारदर्शकता आणण्याचे काम या सनियंत्रण समितीवर होते. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सध्याची परिस्थिती आणि समितीचे कामकाज याबाबत श्री. अनास्कर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी एकूणच मोठी नाराजी व्यक्त केली. सध्या ज्या पध्दतीचे जिल्हा बँकेचे कामकाज, त्यात असलेला राजकीय हस्तक्षेप, सुरू असलेली प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मनमानी, हे प्रकार असेच होत राहिले तर जिल्हा बँकेला उर्जितावस्था मिळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सद्यस्थितीबाबत श्री. अनास्कर म्हणाले की, विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये जिल्हा बँकेचा परवाना रद्द होण्याची शक्यता कमी आहे. बँकेचा परवाना रद्द करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला असले तरी अन्य नागरी सहकारी बँका आणि जिल्हा बँक यात मोठी तफावत आहे. जिल्हा बँकेचे कामकाज त्रिस्तरीय आहे आणि सध्या तीन पक्षांचे सरकार राज्यात आहे. त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. तरीही विद्यमान प्रशासकाने राजकीय हस्तक्षेप न जुमानता कठोर निर्णय घेतले, बँकेचा व्यवसाय वाढवितानाच खर्चात कपात करून आर्थिक व्यवहारात पूर्णपणे पारदर्शकता आणली तर काही प्रमाणात बँकेला यश मिळू शकेल. थकीत कर्जाची वसुली करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यामध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज आहे. ‘कुंपणानेच शेत खाल्ले’ किंवा ‘तळे राखी तो पाणी चाखी’ अशी भूमिका न ठेवता अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही निष्ठेने काम केले पाहिजे. तसे झाले तर तालुका पातळीवरील वसुली अधिकारी आणि सचिवांकडून होणारे गैरव्यवहार कमी होतील. तालुका पातळीवरील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी बँकेच्या मुख्यालयात ‘मिरर अकाऊंट’च्या माध्यमातून कर्जवसुलीसाठी स्वतंत्र कक्ष उघडणे गरजेचे आहे.
जिल्हा बँकेतील ४०० कर्मचाऱ्यांच्या अनावश्यक भरतीबाबतही श्री. अनास्कर यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. जिल्ह्यातील राजकीय मंडळी, तत्कालीन संचालकांमुळेच जिल्हा बँकेवर हा बोजा पडला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी निर्णय कधी होईल हे सांगता येत नाही. त्यांना कामावरून कमी करता येणे अवघड झाले आहे. याला तत्कालीन संचालक आणि अधिकारीच कारणीभूत आहेत. बँकेत सध्या काम नसल्याने या कर्मचाऱ्यांची सेवा अबाधित ठेवून त्यांना दीर्घ रजेवर पाठविता येवू शकते. त्यासाठी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून निर्णय घेता येवू शकतो. मात्र प्रशासन आणि राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती असेल तर हा बोजा कमी कसा करता येईल यावर निर्णय होऊ शकतो, असे मत श्री. अनास्कर यांनी मांडले.