राजकारण

जुन्या गोष्टी सुधारण्यात सात वर्षे गेली, तर मोदींनी नेमकं केलं काय? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

मुंबई : उत्तराखंड दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. हलद्वानी इथे पार पडलेल्या सभेत बोलताना ‘माझं ७ वर्षाचं रेकॉर्ड तपासून पाहा, जुन्या गोष्टी सुधारण्यातच माझा वेळ जात आहे’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मोदींच्या याच वक्तव्याचा धागा पकडत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून ट्विटरद्वारे विचारण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या काळात एकतर अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले वा आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करुन पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम त्यांनी आखून ठेवलाय. भारतीय रेल्वेचे खासगीकरण कऱण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. भाजप विरोधात असताना त्यांनी आधार कार्डला विरोध केला. पुढे सत्तेत आल्यावर मागील सरकारने आखलेल्या रस्त्यावरच पावलं टाकत, आधारकार्डचा राजमार्ग स्वीकारून लोकांना आधारकार्ड बनवण्याची सक्ती केली. इतकेच नव्हे तर आधी जीएसटी प्रस्तावाला विरोध करून सत्तेत आल्यावर जीएसटी धोरण आणले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे.

त्याचबरोबर, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला आधुनिकतेची ओळख पटवून दिली. याच विचाराचा अवलंब करून डिजीटलायझेशनचा नारा मोदींनी दिला. अशा एक ना अनेक मागील सरकारच्या गोष्टीच पुढे नेत मोदी काम करत असताना कोणत्या जुन्या गोष्टी सुधारण्यात आल्या असा प्रश्न देशवासियांना पडला आहे, अशी टीकाही राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान मोदींवर करण्यात आलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button