
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कसे टिकवायचे याबाबत दोघांची चर्चा झाली असे खात्रीलायक वृत्त आहे.
केंद्र सरकारने एसईसीसी डाटा उपलब्ध करून दिल्यास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डाटा तयार करणे अधिक सोपे जाईल, अशी भुजबळ यांची भूमिका आहे. हा डाटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला द्यावा अशा मागणीचा ठराव राज्य विधिमंडळाने अलिकडेच मंजूर केला होता.केंद्र सरकारकडे आणि विशेषता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फडणवीस यांनी वजन वापरावे आणि हा डाटा महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती भुजबळ यांनी फडणवीस यांना भेटून केली.
तुमच्या नेतृत्वात पंतप्रधानांकडे जाण्याची आमची तयारी आहे, असे भुजबळ या भेटीत फडणवीस यांना म्हणाले. त्यावर राज्यात आपले सरकार आहे आणि म्हणून पंतप्रधान मोदी यांना आपल्या नेतृत्वात भेटावे. सोबत मी शंभर टक्के राहीलच असे फडणवीस यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण कुठल्याही परिस्थितीत पुन्हा बहाल झाले पाहिजे, यासाठी एकदिलाने काम करण्याची भावना दोन्ही नेत्यांनी या भेटीत व्यक्त केली.
विधिमंडळाच्या अलीकडे झालेल्या अधिवेशनात भुजबळ आणि फडणवीस यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक रंगली होती. मात्र आज दोघांनीही एकत्र येत ओबीसी आरक्षणासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची संकेत दिले.
छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, इम्पिरिकल डाटाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी चर्चा केली. याबाबत देवेंद्र फणवीस म्हणाले की, ओबीसी राजकीय आरक्षणासंबंधी छगन भुजबळ यांनी आज सकाळी माझी सागर निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मी या प्रश्नात संपूर्ण मदत करेन, असे सांगितले. आम्ही मराठा आरक्षणावेळी राज्यात एम्पिरिकल डाटा गोळा केला होता. तो सुप्रीम कोर्टानेही मान्य केला. त्यामुळे एम्पिरिकल डाटा कसा गोळा करता येईल, यासंदर्भातील आम्ही चर्चा केली. आमच्यासाठी हा राजकीय प्रश्न नाही. मी एक स्वतंत्र नोट तयार करून देतो. या प्रश्नात भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्यासोबत मिळून काम करण्यास आम्ही तयार आहोत.