
नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालया (ईडी) ने शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली. वायकर जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, त्यांच्या चौकशीने एकच खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
रवींद्र वायकर चौकशीला जातील आणि आपली भूमिका मांडतील. भाजपच्या कार्यालयातून जर ईडीची सूत्रे हलत असतील तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आमची सहानुभूती असणाऱ्यांना असा त्रास होणार हे आम्ही गृहितच धरले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केली.
जया बच्चन यांच्या सूनबाई आणि मुलाच्या बाबतीत आम्ही ऐकलं. जे जे सरकारविरोधात बोलतील, सरकारला प्रश्न विचारतील त्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांच्यासमोर उभे करुन अपमानित केले जाईल. त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जाईल हे सूत्र झाले आहे. हे २०२४ पर्यंत चालेल. त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरूड तालुक्यात जमीन खरेदी केली असून गैरव्यवहार केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. अलिबागमधील जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचाही उल्लेख किरीट सोमय्यांनी केला होता. किरीट सोमैया यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी रवींद्र वायकर यांची चौकशी केल्याचे समजते. रवींद्र वायकर यांनी ईडीकडे काही कागदपत्रेही सादर केली आहेत. तसेच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येऊ शकते, असेही ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
हिसाब तो देना पडेगा; किरीट सोमय्यांचा निशाणा
सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली. वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या चौकशीने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू असल्याचं दिसून येत आहे. यावरुन, महाविकास आघाडीचे नेते ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हिशोब तर द्यावाच लागेल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी यानंतर दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरू झाली आहे. मोठ्या मोठ्या बिल्डर्सकडून, महापालिका कंत्राटदारांकडून जो किकबॅक मिळाला आहे, मग तो एफएसआय, कोणत्या कंपनीतील फ्रॉड या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, असंही ते म्हणाले.