राजकारण

आरटी-पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल, तरच मतमोजणी केंद्रात प्रवेश; आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली : निव़डणूक आयोगाने २ मे रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालासंदर्भात अजून एक नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार आता मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने यासंदर्भात एक विशेष आदेश काढला आहे. २ मे रोजी पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरी या पाच राज्यांमध्ये मतमोजणी आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या अनुषंगाने काढलेल्या आदेशात निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्रावर गर्दी करण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर मतमोजणी केंद्र पूर्णपणे सॅनिटाईझ करण्याचेही आदेश दिले आहेत. त्याबरोबर मतमोजणी अधिकाऱ्यांची बैठकव्यवस्था अशी असावी की दोन अधिकाऱ्यांच्या मधे एक अधिकारी पीपीई कीट घातलेला असेल. त्याचबरोबर जिंकणाऱ्या उमेदवारास दोनपेक्षा जास्त व्यक्तींना सोबत आणायला परवानगी नाही.

यापूर्वी निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही.राजकीय पक्षांना मोठ्या प्रचारसभा आयोजित करण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने करोनाच्या दुसऱ्या लाटेला मार्ग मोकळा करून दिला. करोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोगालाच जबाबदार धरलं पाहिजे, असं मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी नमूद केलं. निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मद्रास हायकोर्टाने आयोगाला दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button