अधीर रंजन चौधरी यांना लोकसभा काँग्रेस नेतेपदावरून हटविणार?
नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लोकसभेतील पक्षाचा नेता बदलला जाऊ शकतो. अधीर रंजन चौधरी यांना हटवून त्यांच्याजागी अन्य नेत्याची नियुक्ती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे, या काळातच हा निर्णयदेथखील होण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरच होणार आहे.
अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने लॉबिंग केल्याचे समजते आहे. अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगालच्या बहरामपूर येथून खासदार आहेत. ते विधानसभेला काँग्रेसचा चेहरा होते, तसेच प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. महत्वाचे म्हणजे अधीर रंजन हे काँग्रेसमधील जी-२३ या बंडखोर गटाचे विरोधक आहेत. जेव्हा या नेत्यांनी सोनिया गांधींनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पत्र लिहिले होते, तेव्हा अधीर रंजन हे त्यांच्याविरोधात उभे ठाकले होते.
अधीर रंजन चौधरी यांना लोकसभा गटनेते पदावरून हटविण्याच्या निर्णयामागे तृणमूल सोबतच चांगले संबंध बनविण्याचे पाऊल आहे. तसेच भाजपा विरोधी मोहिमेमध्ये समन्वय राखणे हा देखील उद्देश आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत आघाडी करत तृणमूलविरोधात लढली होती. दुसरीकडे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने ममता यांच्यावर टीका न करण्याची भूमिका घेतली होती. नंतर तृणमूलच्या विजयाचे स्वागतही केले होते.
लोकसभेत काँग्रेसचे नेतेपदाच्या शर्यतीत शशी थरुर आणि मनीष तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. या दोन्ही नेत्यांच्या बंडखोर नेत्यांच्या पत्रावर सह्या आहेत. जर या दोघांपैकी कोणा एकाची नियुक्ती झाली तर काँग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या वापसीच्या आधी गांधी घराण्याकडून आणखी एक प्रयत्न असे पाहिले जाईल. सुत्रांनुसार पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मनीष तिवारी यांना पंजाब काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनवू इच्छित आहेत.