फोकस

तिरुपतीला निघालेल्या नाशिकच्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ ठार, तिघे गंभीर

उस्मानाबाद : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनास उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गाडीला मागून एक टेम्पोने धडक दिल्याने ४ भाविक जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी आहेत.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील काही भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने तिरुपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांचे वाहन उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावानजीक आल्यानंतर चाक फुटले. ते बदलण्यासाठी चालकाने वाहन बाजूला घेतले होते. चाक बदलत असतानाच बीडकडून उस्मानाबादच्या दिशेने भरधाव आलेल्या (एमएच २० इजी १५१७) क्रमांकाच्या टेम्पोने पाठीमागून भाविकांच्या वाहनास जोराची धडक दिली.

या अपघातात वाहनातील भाविक शरद विठ्ठलराव देवरे (४४, रा.वडगाव, ता. मालेगाव), विलास महादू बच्छाव (४६, रा. सायने बु. ता. मालेगाव), जगदीश चंद्रकांत दरेकर (४५, रा.दरेगाव, ता. मालेगाव) व सतीश दादाजी सूर्यवंशी (५०, रा. दरेगाव, ता. मालेगाव) हे चौघे जागीच ठार झाले. तर संजय बाजीराव सावंत (३८), भरत ग्यानदेव पगार (४७, दोघेही रा. सायने बु.) व गोकुळ हिरामण शेवाळे (३८, रा. लोणवाडे, ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ सोलापूरला हलविण्यात आले आहे. घटनेनंतर धडक दिलेल्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याविरुद्ध येरमाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button