कोलकाता: पश्चिम बंगालची सत्ता राखत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं हॅटट्रिक केली. बंगाल जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यभर सभा घेतल्या. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं. मात्र तरीही तृणमूलनं सत्ता राखली. त्यामुळे आता सर्व चक्रं उलटी फिरू लागली आहेत. तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना आपल्या सोबत कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. अनेक नेते तृणमूलमध्ये जाण्याच्या तयारीत असल्यानं काल भाजप प्रदेश कार्यालयात नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या उच्चस्तरीय संघटनात्मत बैठकीला काही मोठे नेते अनुपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. भाजपची सत्ता न आल्यानं बरेसचे नेते पक्ष सोडण्याच्या विचारात आहे. त्यामुळे लवकरच बंगालच्या राजकारणात भूकंप होऊ शकतो.
कोलकात्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सर्व नेत्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं. मात्र या बैठकीला मुकूल रॉय, शमिक भट्टाचार्य आणि राजीव बॅनर्जी यांच्यासारखे दिग्गज नेते अनुपस्थित होते. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती चिंतेचा विषय नाही, असं घोष म्हणाले. ‘भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांच्या पत्नीची तब्येत ठीक नाही. समिक भट्टाचार्य यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. तर राजीव बॅनर्जी वैयक्तीक कारणांमुळे अनुपस्थित आहेत,’ असं घोष यांनी सांगितलं. मात्र बडे नेते पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
राज्यात भाजपचं सरकार येईल या आशेनं तृणमूलच्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला. मात्र भाजपला शंभरीदेखील गाठता आली नाही. तर तृणमूलनं २०० हून अधिक जागा मिळवल्या. पुढील पाच वर्ष विरोधात राहून संघर्ष करणं अतिशय कठीण असल्याची कल्पना दलबदलूंना आहे. ममता विरोधकांना किती कडवी टक्कर देतात, त्यांचे डावपेच कसे हाणून पाडतात, हे या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळेच घरवापसीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास ३० आमदार लवकरच तृणमूलमध्ये प्रवेश करू शकतात.