आरक्षण हक्क कृती समितीही मैदानात; पदोन्नतीतील आरक्षणासाठी २६ जून रोजी मोर्चा

सोलापूर: ओबीसी आरक्षणासाठी भाजपने येत्या २६ जूनरोजी राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्याच दिवशी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात ओबीसी आरक्षणासाठी चिंतन बैठकीचं आयोजन केलं आहे. तर, आरक्षण हक्क कृती समितीनेही २६ जून रोजी मोर्चाची हाक दिली आहे. त्यामुळे आरक्षण हक्क कृती समितीच्या मोर्चाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याविरोधात आरक्षण हक्क कृती समितीने राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे. येत्या २६ जूनरोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यातील ८० हून अधिक मागासवर्गीय कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन आरक्षण कृती समिती स्थापन केली असून मोर्चाची हाक दिली आहे.
मुंबईत काल भाजपची बैठक झाली. यात ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची माहिती दिली. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं सांगतानाच ओबीसींचं आरक्षण घालवून या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. त्याविरोधात येत्या 26 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे.