राजकारण

भाजपची मॅरेथॉन बैठक; ठाकरे सरकारला पावसाळी अधिवेशनात धारेवर धरण्याचा निर्णय !

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजधानी दिल्लीतील गाठीभेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा, ओबीसी पदोन्नती आरक्षणासह विविध विषयांवर ठाकरे सरकारला पावसाळी अधिवेशनात धारेवर धरण्याबाबत चर्चा झाली. तशी माहिती आमदार आशिष शेलार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या संघटनात्मक विकासाची गती, प्रगती आणि विस्तार याबाबत चर्चा झाली. सर्व स्तरावरील सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी या बैठकीत कार्यक्रम आखण्यात आला. तसंच मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा याबाबत महाविकास आघाडी सरकार कसं जबाबदार आहे, याबाबत विस्तृत चर्चा झाली. या मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारला आगामी पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचं शेलार आणि बावनकुळे यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकार मदत करत आहे. ही मदत जनतेपर्यंत पोहोचवणार आणि महानगरपालिका निवणुकीची रणनीतीही आजच्या कोअर कमिटी बैठकीत ठरल्याचं शेलार यांनी सांगितलं.

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेतानाच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीवर खल झाला. पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून राज्याचा आढावा घेण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका निश्चित करण्यात आली. महापालिका निवडणुकीबाबत धारण ठरविण्यावर चर्चा झाली.

कोअर कमिटीच्या या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, संजय कुटे, पंकजा मुंडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button