सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं. आता त्याचा निकाल आला आहे. कुडाळ नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली आहे. करोल यांना ९, तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना ८ मते पडली. अवघे दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष बनला, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे मंदार शिरसाट यांची वर्णी लागली आहे.
कुडाळमध्ये एकूण १७ पैकी ८ जागांवर भाजप, ७जागांवर शिवसेना आणि २ जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. कुडाळमध्ये कोणाचा नगरसेवक बसणार याबद्दल होती सर्वांना उत्सुकता होती. अखेर चमत्कार होईल हा भाजपचा दावा फोल ठरवत महाविकास आघाडीने कुडाळमध्ये झेंडा रोवला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी सात नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेनं दोन नगरसेवक निवडून आलेल्या कॉंग्रेसला नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला. जिल्ह्यातील चार नगरपंचायत पैकी २ भाजप तर दोन महाविकास आघाडीकडे आहेत. तळकोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीनं एकत्र येऊन प्रतिष्ठेची असलेली कुडाळ नगरपंचायत आपल्या ताब्यात घेत राणेंना धक्का दिला आहे.
आ. वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
शिवसेना आ. वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या सदस्यांना गाडीने कुडाळ नगर पंचायत हद्दीत आणल्याने भाजप शिवसेनेत राडा झाला आहे. शिवसेना-कॉग्रेस भाजप कार्यकर्ते यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर जोरदार धक्काबुक्कीही झाली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
गोट्या सावंत कणकवली न्यायालयात शरण
संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आणि आ. नितेश राणे यांचे खंदे समर्थक संदेश उर्फ गोट्या सावंत यांची कणकवली न्यायालयात शरण आला आहे. ७ तारखेला सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळत त्यांना अटकेपासून दहा दिवसांचं संरक्षण देऊन जामीनासाठी स्थानिक न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार गोट्या सावंत कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले.