मुंबईत वांद्रे परिसरात चार मजली इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

मुंबई : मुंबईत रविवारी रात्री उशिरा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आणि यासोबतच इमारत दुर्घटनाही घडली. खेरवाडी परिसरातील रझाक चाळीत चार मजली घराचा भाग कोसळला. रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले असून त्यांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबईच्या वांद्रे पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रझाक चाळीत दाटीवाटीने घरं बनवलेली आहे. शिवाय त्यांचं बांधकामही फारसं मजबूत नाही. या अपघातानंतर अग्निशमन दलाचे जवान ढिगारा हटविण्यासाठी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जिथे घराचा भाग कोसळला ती जागा अतिशय चिंचोळी आहे. दुर्घटना घडली त्यावेळी मुंबईत जोरदार पाऊसही बरसत होता. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांना ढिगारा हटवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.
अपघातानंतर स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर एका तरुणाचा यात मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलेलं तर नाही ना हे याचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. दरम्यान पाऊस सुरु असल्याने आणखी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे.




