Top Newsस्पोर्ट्स

टोक्यो ऑलिम्पिकची शानदार सुरुवात; भारतीय चमूला पंतप्रधान मोदींचे प्रोत्साहन

https://twitter.com/Tokyo2020hi/status/1418564081418752001

टोक्यो : जपानमध्ये आजपासून टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. भारताचं यावेळी १२५ खेळाडूंचं पथक टोक्योला गेलं आहे. यात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. टोकिया ऑलिम्पिकच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात स्पर्धेत सामील झालेल्या सर्व देशांच्या चमूचं मोठ्या दिमाखात संचलन पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हे संचलन आपल्या निवासस्थानी टेलिव्हिजनवरुन अनुभवलं.

https://twitter.com/Tokyo2020hi/status/1418566798065102859

https://twitter.com/Tokyo2020hi/status/1418604183360573442

विशेष म्हणजे, स्पर्धेत सामील सर्व देशांच्या पथकांचं संचलन सुरू असताना भारतीय पथक संचलनासाठी येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. कोरोनामुळे यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविना होत आहे. भारतीय पथकांच्या संचलनाचं नेतृत्व बॉक्सिनंग चॅम्पियन मेरी कोम आणि पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी केलं. दोघांनी भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाची भूमिका पार पाडली.

शानदार सोहळा

वर्षभराहून अधिक काळ जगाला हादरे देणाऱ्या कोविड-१९ महामारीच्या दहशतीत ३२ व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे वर्षभराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी जपानची राजधानी टोकियो येथे स्थानिक संस्कृती आणि परंपरेची झलक दाखवित दिमाखदार सोहळ्याद्वारे उद्‌घाटन झाले. जपानचे सम्राट नारुहितो हे स्वत: उद्‌घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते. सोबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक होते.

महिनाभराआधी त्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त केली होती. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याच्या सादरीकरणातही भावनोत्कट प्रसंग पहायला मिळाले. टोकियोतील सायंकाळ झगमगटात न्हाऊन निघाली असतानाच आशेची किरणे संपूर्ण विश्वाला आनंदायी करणारी होती. महामारीमुळे सर्वच देशांचे कमी खेळाडू पथसंचलनात सहभागी झाले होते. काहींनी दुसऱ्या दिवशी स्पर्धा असल्याने कोरोनामुक्त राहण्यासाठी सोहळ्यात भाग घेतला नाही. भारत २५ व्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला असून यंदा १२७ खेळाडूंचे पथक येथे स्पर्धा करणार आहे. पथसंचलनात सर्वांत पुढे ग्रीसचा संघ होता. भारतीय पथक २१ व्या क्रमांकावर होते. हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग आणि बॉक्सर एम. सी. मेरीकोम हे ध्वजवाहक होते तर २० खेळाडू आणि सहा अधिकारी सोबत होते. सर्वांच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य आणि मनातला जोश ‘आम्ही यंदा मुसंडी मारणार’ हे सांगणारा होता.

https://twitter.com/Tokyo2020/status/1418573922547634183

स्टेडियमच्या आत सोहळा सुरू असताना बाहेर निदर्शक ऑलिम्पिक नकोत, अशी नारेबाजी करताना दिसले. टोकियोत १९६४ नंतर दुसऱ्यांदा ऑलिम्पिक होत आहे. शिंजुकू भागातील न्यू नॅशनल स्टेडियमवर निळ्या तसेच पांढऱ्या रंगाच्या आतषबाजीने सुरुवात झाली. कार्यक्रमाला अमेरिकेच्या प्रथम महिला झील बायडेन यांचीही उपस्थिती होती.

https://twitter.com/Tokyo2020/status/1418581055481663488

सोहळ्यात सर्व देशांनी स्त्री-पुरुष समानता आणि वांशिक न्याय या सामाजिक विषयांना आपला पाठिंबा दर्शविला. पुरुष आणि महिला दोघांनाही समान स्थान देणारे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. त्यामुळे प्रत्येक देशाकडून एक पुरुष आणि एक महिला असे दोन ध्वजवाहक नेमण्यात आले आहेत. एकता, शांतता आणि एकजुटता यावर भर देण्यात आला. स्वस्थ राहण्यासाठी फिटनेसची गरज दर्शविणारे नृत्य फारच आकर्षक होते. ट्रेडमिलवर धावणारी महिला‘ महामारीतही एकट्याने सराव करण्याची वेळ आली तरी थांबू नका, निराश होऊ नका,’ असा संदेश देत होती.

https://twitter.com/Tokyo2020/status/1418584011350310915

यजमान जपानच्या ध्वजवाहकांमध्ये एका आरोग्य कर्मचाऱ्याचा देखील समावेश करण्यात आला. महामारीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा याद्वारे सन्मान करण्यात आला. ज्या माजी ऑलिम्पिकपटूंनी कोरोना काळात जीव गमवाला त्यांच्या स्मृतींना देखील यावेळी अभिवादन करण्यात आले.त्याचवेळी म्युनिचमधील १९७२ च्या ऑलिम्पिकमध्ये मृत्युमुखी पडलेले इस्रायलचे खेळाडू, २०११ च्या भूकंप व त्सुनामीमध्ये जीव गमावणाऱ्या नागरिकांचा देखील उल्लेख करण्यात आला. सर्वांना श्रद्धांजली म्हणून एक मिनिट मौन पाळण्यात आले. बांगला देशचे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांचा ‘द ऑलिम्पिक लॉरेल’ने गौरव करण्यात आला.

ऑलिम्पिक विरोधी निदर्शने सुरूच

ऑलिम्पिक सुरू होण्याच्या काही तास आधीपर्यंत आयोजन रद्द करण्याच्या मागणीसाठी जपानमधील काही नागरिकांनी विरोध सुरूच ठेवला आहे. आजही ५० वर निदर्शकांनी हातात फलक घेत महानगर प्रशासनाच्या इमारतीपुढे नारेबाजी केली. त्यांच्या हातात,‘नो टू ऑलिम्पिक्स’ आणि सेव्ह पीपल्स लाईव्हज’ अशा घोषणा असलेले फलक होते. कॅन्सल द ऑलिम्पिक’चे बॅनर वारंवार फडकविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button