पुण्यातील सॅनिटायझर कंपनीत भीषण अग्नितांडव; १५ महिलांसह १८ मजुरांचा मृत्यू
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची घोषणा

पुणे : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील एसव्हीएस कंपनीत लागलेल्या भीषण आगीत १८कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. आगीमुळे कंपनीमध्ये १० ते १५ मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या उरवडे गावाजवळ ही घटना घडली असून आग लागलेल्या या एसव्हीएस कंपनीमध्ये सॅनिटायझरचे उत्पादन केले जाते. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या उरवडे गावाजवळ ही घटना घडली आहे. सॅनिटाइझर तयार करणाऱ्या एसव्हीएस कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. या आगीमुळं कंपनीमध्ये १० ते १५ मजूर अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली. यामध्ये बऱ्याच महिलांचा देखील समावेश असल्याचेही सांगितले जात आहे. उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या रासायनिक कंपनीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. यामध्ये १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १५ महिला २ पुरूष आहेत. यापैकी १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज ४१ कामगार कामावर उपस्थित होते. १७ कामगार हे एसी लावून आतमध्ये माल पॅक करीत होते. त्यांची खोली बंद असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगीत त्यांचा मृत्यू झाला. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी जेसीबीच्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे..
सॅनिटायझर हे अत्यंत ज्वलनशील असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीमध्ये नेमकी किती जिवीत हानी झाली किंवा आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या कंपनीत लागलेल्या भीषण आगीला विझविण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. आतमध्ये अडकलेल्या मजुरांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने आत अडकलेल्या मजुरांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. या परिसरामध्ये प्रचंड धुराचे लोट दिसत आहेत.
मुळशी तालुक्यातील उरवडे एमआयडीसीतील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या दु:खातून सावरण्याची आई जगदंबा त्यांना शक्ती देवो, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले आणि भावपूर्ण श्रद्धांजली व्हायली आहे.
पुण्याच्या केमिकल फॅक्टरीत आग लागल्याची बातमी फार दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या सर्व मृत्यू पावलेल्या व त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर बरे करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, असे ट्विट केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.
मुळशीमधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली. या केमिकल कंपनीत सकाळी ४१ कर्मचारी कामासाठी आले होते. या ४१ पैकी १७ लोक मिसिंग आहेत. त्यापैकी १५ महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाली, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आगीच्या चौकशीचे आदेश
आग नेमकी कशी लागली? कशामुळे लागली? या सर्व दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आगीची दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ एक समिती देखील गठीत केली आहे. लवकरच या कंपनीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुळशीत शोककळा
या घटनेमुळे संपूर्ण मुळशीत शोककळा पसरली आहे. मृतक सर्व महिला या गरीब घरातल्या होत्या. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे परिसरात खूप हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकांची ओळख पटणं देखील कठीण आहे.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची घोषणा
अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
आग विझली असली तरी कूलिंग ऑपरेशन सुरू
मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आग विझली असली तरी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील आणि दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भात अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहोचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत.
राज्यपालांना दुःख
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुळशी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत काही निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या तीव्र शोक संवेदना कळवतो. तसेच कारखान्यातील इतर सर्व लोकांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटलेय.