मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर मराठा तरुण आक्रमक

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मराठा समाजही आक्रमक झाल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते निदर्शनं करत आहेत. मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्यातील सर्वच पक्षांनी केल्याचा आरोप या तरुणांनी केलाय.
मराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका ही चालढकल करण्याची राहिली आहे. समाज आता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. एक वेगळं संघटन, एक वेगळा पक्ष असावा अशी समाजाची भावना आहे. वेळ पडली तर आरक्षण मिळवण्यासाठी हा लढवय्या समाज आक्रमक होईल, असा इशारा मराठा समन्वयक अंकुश कदम यांनी दिलाय. दरम्यान, शुक्रवारी दुपारी वर्षा बंगल्याबाहेर मराठा समाजातील तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली.




