कोरोना प्रतिबंधक लस पुरवठ्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला ८ पुरवठादारांचा प्रतिसाद

मुंबई : सर्व मुंबईकर नागरिकांना कोरोना-१९ प्रतिबंधक लस देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जागतिक स्तरावर प्रसिद्धीस दिलेल्या लस पुरवठा स्वारस्य अभिव्यक्तीस आज (२५ मे २०२१) आणखी ३ संभाव्य पुरवठादारांचा प्रतिसाद लाभला आहे. यामुळे एकूण संभाव्य पुरवठादारांची संख्या ८ इतकी झाली आहे. नव्याने आलेल्या पुरवठादारांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असून, त्यामुळे या स्वारस्य अभिव्यक्तीस मंगळवार दिनांक १ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावातील ८ संभाव्य पुरवठादारांपैकी ७ पुरवठादारांनी स्पुटनिक फाईव्ह तर त्यातीलच एका पुरवठादाराने स्पुटनिक लाईट या कोविड लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर उर्वरित एका पुरवठादाराने अस्ट्राझेनका फाईजर या लसीचा पुरवठा करण्यात स्वारस्य दाखविले आहे.
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे व सहकारी अधिकारी कोरोना लस पुरवठा उपलब्ध करुन घेण्याबाबतची ही कार्यवाही पार पाडत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर दिनांक १२ मे २०२१ रोजी स्वारस्य अभिव्यक्ती प्रकाशित केली. त्यानंतर दिनांक १८ मे २०२१ च्या मुदतीत एकूण ५ संभाव्य पुरवठादारांचे प्रस्ताव प्राप्त झाले. तथापि, प्राप्त प्रस्तावातील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या स्वारस्य अभिव्यक्तीला मुदतवाढ देणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार आज (दिनांक २५ मे २०२१) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आज आणखी ३ संभाव्य पुरवठादारांनी प्रस्ताव सादर केले. मात्र, त्यांच्यादेखील काही कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक आहे.
विशेषतः लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या या दोहोंदरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीपणे होईल, याची खात्री पटेल. त्यासोबत नेमक्या किती दिवसात लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या ४ मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन महानगरपालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
काल (दिनांक २४ मे २०२१) एका संभाव्य पुरवठादाराबरोबर महानगरपालिका प्रशासनाने दृकश्राव्य प्रणालीद्वारे चर्चा केली. त्यानंतर आज (दिनांक २५ मे २०२१) सकाळी ४ संभाव्य पुरवठादारांसोबत दृकश्राव्य प्रणालीद्वारे चर्चा करण्यात आली. स्वारस्य अभिव्यक्तीची आजची मुदत संपुष्टात येत असतानाच नव्याने ३ प्रस्ताव प्राप्त झाल्याने तसेच त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने मंगळवार दिनांक १ जून २०२१ पर्यंत स्वारस्य अभिव्यक्तीला मुदतवाढ देणे आवश्यक ठरले आहे. मात्र, आता दिनांक १ जून २०२१ पर्यंतच्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तसेच आणखी कोणाला प्रस्ताव सादर करावयाचा असल्यास संपूर्ण कागदपत्रांसोबतच पूर्ण प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. सर्व संभाव्य पुरवठादारांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
सर्व प्रस्तावांची कागदपत्रांसह पूर्ण छाननी करुन महानगरपालिका प्रशासनाकडून वाटाघाटी करण्यात येत आहेत. अधिकाधिक प्रस्ताव प्राप्त होत असल्याने स्पर्धांत्मक व वाजवी पद्धतीने ही सर्व कार्यवाही पूर्ण करता येणार आहे.




