
ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खा. नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन शहरातील पावसाची परिस्थिती, नागरिकांच्या तक्रारी तसेच आपत्कालीन यंत्रणांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी खा. म्हस्के, महापौर पिंपळोलकर यांच्या समवेत शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी.गोदेपुरे, दीपक झिंजाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी आदी उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून शहरातील विविध भागांतील स्थिती, सखल भागातील पाणी साचण्याच्या घटना, झाडे पडणे, वाहतूक व्यवस्था तसेच आपत्कालीन सेवांच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देण्याच्या तसेच आवश्यक ठिकाणी मनुष्यबळ व यंत्रसामग्री तत्परतेने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शहरात ज्या ज्या ठिकाणी पंप लावले आहे ते सुरू आहेत किंवा कसे याचे देखील मॉनिटरींग आपत्कालीन नियंत्रण कक्षामार्फत करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सखल भागातील पाण्याचे निचरा होतो की नाही हे देखील या कक्षामार्फत सीसीटिव्हीच्या माध्यमातून पाहण्याचे काम सुरू असल्याचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी नमूद केले.
महापौरांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल तसेच इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून कामकाज करत असल्याबाबतचा आढावा घेतला तसेच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी 022-25371010 या क्रमांक संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
खा. म्हस्के यांनी केले महापालिका प्रशासनाने कौतुक
ठाणे शहराला हवामान खात्याने रेड ॲलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज् आहे. शहरातील ज्या ठिकाणी पाणी साचत आहे त्या ठिकाणी महापालिकेने पंप बसविले आहेत तसेच पाणी उपसा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी फिल्डवर सज्ज आहे. ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर या देखील सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच शहरातील पाणी साचणा-या सखल भागांची पाहणी करीत आहेत. तसेच नगरसेवक देखील त्यांच्या प्रभागात नागरिकांना सहकार्य करण्यासाठी सज्ज् आहेत. विटावा सबवे, भांजेवाडी, वंदना टॉकीज आदी सखल भागात पाणी साचते त्या ठिकाणी महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित असून पाण्याचा निचरा देखील सुयोग्य पध्दतीने होत असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले. महापालिकेने सर्व ठिकाणी योग्य नियोजन केले असून ज्या ठिकाणी गरज भासत आहे तेथे देखील तात्काळ यंत्रणा पोहचत आहे. शहरात ज्या ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत ते देखील उचलण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.




