
राजकारणातच फक्त गटबाजी नसते, तर ती सारस्वतांच्या दरबारातही असते. तिथंही मानापमान नाट्याचे प्रयोग रंगत असतात. नाशिकला साहित्य संमेलन मिळाल्यापासून वाद आणि नाशिक हे जणू समीकरणच झालं आहे. त्यातही राज्याचे मंत्री छगन भुुजबळ हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि संयोजनात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा मोठा सहभाग हा वादाचा विषय झाला होता. कौतिकराव ढाले पाटलांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांच्या उपस्थितीचा मुद्दा काढून अगोदरच तेल ओतले होते. त्यावर बरंच कवित्व झालं. भुजबळ यांच्यासारखा पुरोगामी नेता साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष असताना महिलांना अवघे १२ टक्के प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला जावेद अख्तर आणि पानिपतकार विश्वास पाटील यांना बोलवण्यामुळं वाद झाला. खरंतर यापूर्वीच्या साहित्य संमेलनाची उद्घाटनं बिगर मराठी साहित्यिकांनी केली आहेत, नाशिकला तर फक्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलवालं होतं, तरीही वाद झाला. विश्वास पाटील यांनी निवृत्त होण्याच्या दिवशीच केलेल्या घोटाळ्यामुळं त्यांच्या नावाला विरोध झाला. भ्रष्ट साहित्यिक प्रमुख पाहुणा म्हणून नको, असा वाद घातला गेला. साहित्य संमेलनाचा दिवस जसाजसा जवळ येत आहे, तसे-तसे वादाचे पडघम जास्त तीव्रतेने वाजताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं नाही, त्यामुळं भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजीनाट्य सुरू केलं.
महापौर सतीश कुलकर्णी यांनी भाजप नेत्यांना निमंत्रण नाही, त्यांचे पत्रिकेत नाव नाही, यावर जोरदार आक्षेप घेतला. भाजप नेत्यांचा निधी चालतो, मग नाव का नाही, असा सवाल केला. त्यानंतर भुजबळ यांनाच फ़डणवीसांशी बोलावं लागलं. राज्यात मुसळधार पाऊस एसटीचा संप यामुळं उपस्थिती किती हा प्रश्न असताना आता साहित्यबाह्य विषयांनी संमेलन गाजतं आहे.
संमेलनाध्यक्षांच्या भाषणाच्या प्रती साधारणतः साहित्य संमेलनाच्या अगोदरच्या दिवशी माध्यमांकडं देण्याचा प्रघात आहे. त्यामुळं संमेलनाच्या दिवशीच्या अंकात ते भाषण छापलं जात असतं; परंतु ठाले पाटलांनी नवा नियम केला आहे. आता या प्रती अध्यक्षांच्या भाषणानंतर दिल्या जाणार आहेत. आता थेट संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचीच संमेलनात कथाकथनाऐवजी फक्त संवादावर बोळवण केल्याचं समोर आलं आहे. सोबतच ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांचंही नाव अचानक गायब करण्यात आलं आहे. डॉ. नारळीकर हे स्वतः साहित्यिक आहेत. त्यांनी विपुल लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञानकथा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस असे अनेक कथासंग्रह त्यांच्यावर नावावर आहेत. स्वतः संमेलनाध्यक्षांनी आपण साहित्य संमेलनात कथाकथन करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, इथं उलटंच झालं आहे. साहित्य संमेलनाच्या पत्रिकेतून चक्क संमेलनाध्यक्षांचं कथाकथनच गायब करण्यात आलं आहे. त्याऐवजी त्यांच्या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमेलनाच्या दुसर्या दिवशी सत्कार सोहळ्यानंतर त्यांचा हा संवाद कार्यक्रम होणार आहे. तिथंही त्यांना फक्त अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला आहे. खरं तर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष स्वतः कथाकथन करणार ही ऐतिहासिक गोष्ट होती. आजवर असं कधीही घडलेलं नाही. मात्र, आलं निमंत्रकांच्या मना तिथं कोणाचं चालेना, अशी गत सध्या झालेली दिसत आहे. नाशिकच्या साहित्य संमेलनात कला प्रदर्शनाला विशेष जागा देण्यात आली आहे. या प्रदर्शनासाठी ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते हे उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेतून गायब करण्यात आलं आहे. याबद्दल चित्रकारांमध्ये तीव्र नाराजी आहे. कोलते संमेलनात उपस्थितांशी संवाद साधणार होते. स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार होते. मात्र, आता त्यांचं नावच वगळण्यात आल्यानं ते संमेलनासाठी उपस्थित राहणार की नाही, याची चर्चा सुरू आहे. साहित्य संमेनात आता मानापमान नाट्याचा अंक सुरू झाला असून, त्यावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांना साधं निमंत्रणही देण्यात आलं नाही. ग्रंथदिंडी व्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावणार नसल्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर मनधऱणी नाट्य झालं.




