
मुंबई : क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानमुळे बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपासून अनन्या पांडेची सहा तास चौकशी करण्यात आली आहे. आता पुन्हा तिला सोमवारी चौकशीला बोलविण्यात आले आहे. यामागे तिने मोबाईलमधील चॅट आणि कॉन्टॅक्ट डिलीट केल्याचा संशय आहे. अनन्याने एनसीबीला आर्यन खानला कोण ड्रग्ज पुरवते त्याची माहिती दिली आहे.
अनन्याने कोणत्यातरी सेलिब्रिटीचा नोकर हे ड्रग्ज पुरवतो, असे एनसीबीला सांगितल्याचे समजते आहे. आर्यन खानला ड्रग्ज पुरविणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखते असे तिने एनसीबीला सांगितले आहे. शनिवारी समोर आलेल्या मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, एनसीबीने २४ वर्षांच्या एका हाऊस हेल्परची चौकशी केली आहे. हा तरुण एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी काम करतो. हा तोच तरुण आहे जो कथितरित्या अनन्याच्या सांगण्यावरून आर्यनला ड्रग्ज देत होता. एनसीबीने या तरुणाला मालाड येथून ताब्यात घेतले आहे. आता त्याची चौकशी करून अनन्याला सोमवारी प्रश्न विचारले जाणार आहेत.
…तर अनन्याला अटक
आर्यन खानला एनसीबीने २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवरून ताब्यात घेतले होते. त्याच्यासह अन्य ८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांना अटक करण्यात आली. आर्यन खानला ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जर सोमवारपर्यंत एनसीबीला ठोस पुरावे सापडले तर अनन्या पांडेला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात
अमली पदार्थ विरोधी पथकानं आता आर्यन खानच्या बँक खात्यातील व्यवहारांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. ड्रग्ज खरेदी करण्यासाठी आर्यन खान यानं त्याच्या बँक खात्यातून कोणता व्यवहार केला आहे का याची तपासणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. जर तसं केलं असेल तर आर्यन खाननं नेमकं कोणत्या खात्यात आणि किती पैसे वळते केले होते? कोणत्या व्यक्तीला आणि कशासाठी पैसे दिले गेले याची सविस्तर चौकशी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आज सकाळी एनसीबीनं मागणी केलेल्या कागदपत्रांचा लिफाफा घेऊन एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात पोहोचली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानकडून आर्यन खानच्या ड्रग्जप्रकरणी काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्याच संदर्भातील कागदपत्रं आज एनसीबीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आर्यन विरोधात सबळ पुरावे जमा करण्याचं काम एनसीबीकडून केलं जात आहे. आर्यन खानला जामीन नाकारण्यासाठीची जोरदार तयारी एनसीबीकडून करण्यात येत आहे.




