Top Newsराजकारण

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून फडणवीसांची मनधरणी

मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपकडूनही संजय उपाध्याय यांचं नामांकन दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फक्त राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. अन्य कुठलाही प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय. आता भाजप काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

एखाद्या दुर्दैवी घटनेमुळं जागा रिक्त होते तेव्हा महाराष्ट्राची परंपरा आहे की ती निवडणूक बिनविरोध करायची. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपण कोअर कमिटीशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं सांगितल्याचं थोरात म्हणाले. या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही चर्चा झालेली नाही, असंही थोरात म्हणाले.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातलं अशी चर्चा सुरु असल्याचं पत्रकार म्हणाले. त्यावेळी लोटांगण नाही किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज नाही. याबाबत सर्वांना माहिती होती. ही परंपराच आहे. त्याचबरोबर आम्हाला निवडणूक जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. मात्र, महाराष्ट्राची परंपरा, जो प्रघात आहे तो कायम राहावा म्हमून फडणवीसांची भेट घेतली. ती दोघांचीही जबाबदारी आहे, असं थोरात म्हणाले.

दरम्यान राज्यसभेच्या बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपसमोर लोटांगण घातल्याची भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा बिनविरोध निवडणुकीच्या बदल्यात, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचं सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button