राजकारण

फडणवीसांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीच्या राजकुमार ढाकणेंची हकालपट्टी

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य असलेले राजकुमार ढाकणे यांची प्राधिकरणातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याबाबत केलेल्या तपासात ढाकणे यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षी राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ढाकणेंच्या नियुक्तीला जोरदार विरोध केला होता. याबाबतचे पत्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले होते. यासंदर्भातील चौकशी अहवालानंतर ठाकरे सरकारने ढाकणेंना हटवण्याबाबतचे आदेश जारी केली आहे.

पोलिसांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण गठीत करण्यात आलं. त्याला सत्र न्यायालयाच्या समान अधिकार आहेत. संपूर्ण राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांविरोधातील तक्रारींची निपटारा करण्यासाठी हे प्राधिकरण असल्याने यातील नियुक्त्या डोळ्यात तेल घालून व्हायला हव्यात. पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नेमणूक होत असेल तर ते अतिशय गंभीर आणि पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करणारे आहे. सुमारे पावणे तीन लाख वेतन या पदासाठी आहे. गृहमंत्रालयाने विशेष अधिकार वापरून राजकुमार ढाकणेंची नियुक्ती केली आहे. हत्येचा प्रयत्नसारखे गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याचाही आरोप आहे. मग कुठलीही शहानिशा न करता ही नियुक्ती कशी झाली? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.

राजकुमार ढाकणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. गेली १७ वर्ष ते राजकारणात आहेत. तसेच ते उद्योजक आहेत. पुणे शहरातील येरवडा, गांधीनगर, फुलेनगर, शास्त्रीनगर, जयप्रकाश नगर याभागात त्यांचे वर्चस्व आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राजकुमार ढाकणे प्रकरणाची सखोल चौकशी केली. अहवालात ढाकणे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले. २०१५ मध्ये राजकुमार ढाकणे यांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुण्यातील कोरेगाव पोलीस स्टेशनात गुन्ह्याची नोंद आहे. त्या आधारावर राजकुमार ढाकणे यांना महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणामधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांच्या विरोधात होणाऱ्या तक्रारींबाबत चौकशीसाठी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण गठित करण्यात आला होता. १४ जुलै २०२० रोजी राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीसंदर्भात राज्य शासनाच्या गृह विभागाने नोटिफिकेशन काढले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ढाकणेंच्या नियुक्तीला विधानसभेत आक्षेप घेतला होता. त्यानंतर गृह खात्याने चौकशी बसवली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button