Top Newsराजकारण

पहिल्या दिवसाच्या वादावादीनंतर, दुसऱ्या दिवशी सत्ताधारी-विरोधकांचे मनोमिलन !

मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नितीन राऊत यांच्यामध्ये काल झालेल्या विधानसभेतील जोरदार खडाजंगी नंतर आज दोघांचे मनोमिलन झालेले दिसले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपची यथेच्छ धुलाई झालेली असताना, हे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे उचंबळून आलेले प्रेम पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

विधिमंडळ अधिवेशनात काल रंगलेली जुगलबंदी साऱ्यांनीच याची देही याची डोळा घरात बसून टीव्हीवर पाहिली असेल. मग तो भास्कर जाधवांचे खास त्यांच्या लकबीतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली नक्कल…त्यावरून उडालेला राजकीय धुरळा…आणि शेवटी जाधवांना मागावी लागलेली बिनशर्त माफी….त्यानंतर मग मंत्री नितीन राऊत, नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रंगलेली खडाजंगी. मात्र, आज नवा दिवस. या मंडळीच्या पुन्हा भेटीगाठी झाल्या आणि चक्क कानगोष्टीच रंगल्या की. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस आणि नितीन राऊत यांचा गेल्या काही दिवसांपासूनचा संघर्ष तर उभ्या महाराष्ट्राने पाहिला. मग तो विधान परिषदेत काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालेला असो, की त्यापूर्वी रंगलेली जोरदार टोलेबाजी. मात्र, राजकारण कसं आळवावरच्या पाण्यासारखं असतं. त्यामुळं हे सारे आरोप-प्रत्यारोप दुसऱ्या दिवशी विसरले जातात. हेच आजही दिसलं.

विधानसभेत मंत्री नितीन राऊत यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख घेत शरसंधान साधले. राऊत म्हणाले की मोदी शेतकऱ्यांच्या खातामध्ये पन्नास-पन्नास लाख देईन, असे म्हटले होते. ते त्यांनी दिले का, असा उल्लेख त्यांनी केला. या वक्तव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हरकत घेतली. त्यांनी राऊतांना थेट आव्हान दिले. पंतप्रधानांनी असे म्हटलेले वाक्य राऊतांनी दाखवून द्यावे, अन्यथा सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. शिवाय सभागृहात नसणाऱ्या व्यक्तीबद्दल असे वक्तव्य करू नये. आम्ही तुमच्या नेत्यांबदद्दल असे बोलायचे का, असा इशारा दिलाय. शिवाय देशाच्या पंतप्रधानांबद्दल चुकीचे वक्तव्य ठेवले जात असेल, तर ते मान्य नाही. ते कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी केली. यावरून जोरदार खडाजंगी रंगली.

महाराष्ट्राचा इतिहास पाहिला की, त्याची सर्वात जास्त ओळख होते प्रगल्भ राजकीय संस्कृतीसाठी. आता हेच पाहा बाळासाहेब ठाकरे शरद पवारांवर निवडणुकीत किती टोकाची टीका करत. मात्र, त्यांच्या काही खासगी कार्यक्रम असो की, राजकारणापलीकडचा एखादा जाहीर कार्यक्रम. त्याचे निमंत्रण पवारांना असायचेच. त्यांनी जाहीरपणे केलेले एकमेकांचे कौतुकही आपण पाहिले आणि ऐकले. दुसरे उदाहरण म्हणजे विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांचे. विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिका टोकाच्या. मात्र, ते किती जीवलग मित्र होते, हे आपण जाणतोच. ते काहीही असो. आरोप-प्रत्यारोप, राजकारण हे होत राहतंच. मात्र, अशाच कानगोष्टी आणि प्रगल्भ राजकीय संस्कृती महाराष्ट्राला पुढे घेऊन जाते, याच शंकाच नाही. यातून आपण आणि कार्यकर्त्यांनी शिकायचं काय, ते तुम्हीच ठरवावं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button